मॉर्निंग वाकला गेले अन् दंड भरून आले...कुठे वाचा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

नागरिकांनी आपल्या घरांमध्ये राहावे याकरिता पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न चालवले आहेत. यामध्ये काही जणांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद ही मिळाला आहे. तर काही जणांना उठाबशा काढण्याची शिक्षा करण्यात आली. 

कळमनुरी (जि. हिंगोली) : बंदच्या काळात बाहेर पडू नका, या प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून शनिवारी (ता.दोन) सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या आठ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या घरामध्ये राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे वारंवार आवाहन केल्यानंतरही नागरिक, युवक घराच्या बाहेर पडत आहेत.

हेही वाचाधक्कादायक : हिंगोलीत कोरोनाबाधितांचे अर्धशतक

जणांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

 नागरिकांनी आपल्या घरांमध्ये राहावे याकरिता पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न चालवले आहेत. यामध्ये काही जणांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद ही मिळाला आहे. तर काही जणांना उठाबशा काढण्याची शिक्षा करण्यात आली. विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरणाऱ्या नागरिक व युवकांना पोलिसांनी चपराक देत त्यांच्या मोटर सायकल जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

समज देण्याचा प्रयत्न

 याशिवाय प्रशासनाचे आदेश झुगारून शहरात फिरणाऱ्या भाजीविक्रेत्या विरुद्धही पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा धसका अनेकांनी घेतला आहे. पोलिस प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न चालविला असतानाच शहरातील काही भागातील नागरिक पोलिस प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मॉर्निंग वाकला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले. 

चार हजार रुपयांची दंडात्मक कारवाई 

त्यावरून पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, कर्मचारी सूर्यकांत भारशंकर, श्यामराव गुहाडे, सुनील रिठे, प्रशांत शिंदे, शिवाजी बंदुके, बापू वाईकर यांनी शनिवारी पहाटे सातव महाविद्यालय परिसर व महाकाली नगरमध्ये मॉर्निंगला जाणाऱ्या आठ नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध चार हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गावठी दारू अड्डयावर छापा

आखाडा बाळापूर:  येहळेगाव तुकाराम (ता. कळमनुरी) येथे पोलिसांनी शनिवारी (ता.दोन) गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून सहाशे लिटर सडक्या रसायनासह वीस लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी गुन्हा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

येथे क्लिक कराकळमनुरीत दुकानाला आग, लाखोंची नुकसान

गावठी दारू तयार करण्याचे काम

येहळेगाव तुकाराम येथे काही ठिकाणी बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, जमादार संजय मार्के, मधुकर नागरे, बाबूराव चव्हाण, गजानन मुटकुळे, राजू जाधव, पंढरीनाथ चव्हाण यांच्या पथकाने सायंकाळी पाच वाजता छापा टाकला. 

८४ हजार रुपयांची दारू

यामध्ये एका ठिकाणी बेकायदेशीररित्या दारू काढणे सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता दारू गाळपासाठी लागणारे ६०० लिटर रसायन, वीस लिटर गावठी दारू जप्त केली आहे. या दारूची किंमत ८४ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

विशेष पथक स्थापन

 या वेळी दारू गाळपासाठी असलेले सडके रसायन नष्ट करून दारू जप्त केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता बेकायदेशीर दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले असून या पथकामार्फत दररोज कारवाई केली जाणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning was bent and the penalty was paid read where Hingoli news