तुमचा एक रिस्पॉन्स पडेल भारी

मनोज साखरे
Wednesday, 11 December 2019

पोर्नोग्राफिकल वेबसाईटवरही मार्फ केलेले फोटो टाकण्याचे तसेच फेसबुकवर प्रसारित करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे विनाकारण तरुणींची बदनामी केली जात आहे. 

औरंगाबाद - फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर चॅटिंगसाठी विविध प्रकारचे प्रयत्न "हनी ट्रॅपर' करतात. प्रसंगी फोटो पाठवून भुरळ घातली जाते. अशावेळी तुमचा एक रिस्पॉन्सही भारी पडू शकतो. एक चूक नडू शकते. "हाय..हू आर यू?' पासून "लाईक यू'पर्यंत जाणाऱ्या चॅटिंगमुळे वैयक्तिक आयुष्यात समस्या, अडचणी निर्माण होऊ शकतात.

टेक्‍नॉलॉजी व्यवस्थित वापरली नाही, तर तिचे फायद्याएवढेच तोटेही आहेत. त्यामुळे फेसबुक, व्हॉटस्‌अपने अनेकींना वैताग आणल्याच्या तक्रारीही सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. सोशल अकाऊंटसच बंद करण्याची नामुष्कीही काहींवर आली आहे. टेक्‍नॉलॉजी वापरताना दक्षता न घेतल्यामुळे अनेक गंभीर परिणामांना महिला, तरुणींना तोंड द्यावे लागत आहे.

महिला, मुलींना टार्गेट करणे सोपे असल्याने, त्यांच्याकडून प्रतिरोध होत नसल्याने सायबर गुन्हेगार, हनी ट्रॅपर भावनिक जाळे पसरवतात. फेसबुकवरील अश्‍लील ग्रुपमध्ये ऍड करणे, मार्फिंग टेक्‍नॉलॉजीचा वापर करून विचित्र, अश्‍लील फोटो "हनी ट्रॅपर' ग्रुपमधील अन्य सदस्यांना टाकतात.

पोर्नोग्राफिकल वेबसाईटवरही मार्फ केलेले फोटो टाकण्याचे तसेच फेसबुकवर प्रसारित करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे विनाकारण तरुणींची बदनामी केली जात आहे. 

औरंगाबादही जाळ्यात
सायबर क्राईमच्या विळख्यात यूर्जस अडकत असून राज्यात मुंबई, ठाणेनंतर आता औरंगाबाद सायबर क्राईमचे गुन्हे घडण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गत वर्षांत पोलिस ठाणे वगळता 148 प्रकरणे निव्वळ प्रकरणे सायबर सेलकडे दाखल झाली. मात्र, त्यानंतरही सोशल साईटवरून तरुणींना फसविण्याचे, चारित्र्यहनन करण्याची प्रकरणेही आली. मात्र, त्यात गुन्हा नोंद न करता त्यांनी माघार घेतली. 

हेही वाचा : सीसीटीव्ही : गुलेरने काच फोडून ते अशी करायची बॅग लिफ्टिंग 

व्हॉटस्‌ऍप वापरा जबाबदारीने
व्हॉटस्‌ऍप वापरणाऱ्यांवरही "हनी ट्रॅपर'ची नजर असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून, फसवी मैत्री करून, इतरत्र ठिकाणांहून मोबाईल नंबर मिळवायचे, अकाऊंटवर पाळत ठेवत सर्फिंगच्या लास्ट सिनवरूनही ट्रॅपर अंदाज लावतात. मॅसेज पाठवून कुठेतरी भेटल्याचा बनाव करून जवळीक साधतात.

हेही वाचा : सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगणा अटकेत 

चॅटिंगचा एक रिस्पॉन्स मिळाला की, ते आधी मैत्री नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. छान-छान फोटो शेअर करून भुरळ पाडायची, प्रसंगी अश्‍लील मॅसेजही सेंड करायचे. परत रिस्पॉन्स मिळाला की, मग ट्रॅपरची आशा बळावते. लगेचच प्रेमाचे नाटक करून इप्सित साध्य करायचे, अशी पद्धत आता ते वापरू लागले आहेत. 

फेसबुक वापरताय, हे टाळा....

  •  एफबीवर तुमचे लोकेशन अपडेट करू नका 
  •  वैयक्‍तिक फोटो, माहिती टाकू नका 
  •  नकारार्थी, चुकीचे, उग्र विचार मांडू नका 
  •  अनोळखी व्यक्‍तींची फ्रेंड रिक्‍वेस्ट टाळा 
  •  फ्रेंड लिस्ट वाढविण्याची स्पर्धा नको 
  •  एफबीवरून मोबाईल नंबर देऊ नका 
  •  दुसऱ्याबद्दल चुकीची, अपमानजनक कॉमेंटस नकोच. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai, Thane Aurangabad in number of cybercrime crimes