खून, आत्महत्येच्या घटनेने समाजमन सून्न, नागरिकांसाठी ही संयमाची वेळ

Coronavirus Affects Citizens Lives, Latur News
Coronavirus Affects Citizens Lives, Latur News

लातूर : पुणे, मुंबई तसेच परराज्यातील नागरीकांना गावाकडे आल्यानंतर मिळणारी वागणूक ही गुन्हेगाराच्या पलीकडली असल्याने हा सामाजिक प्रश्न बनू पाहत आहे. यातून लातूर जिल्ह्यात दोन खून, एक आत्महत्या झाली. कोरोना योद्धे असणारे पोलिस आणि आरोग्य सेवकांना मारहाणीचे सात आठ प्रकार घडले. कोरोनाच्या नियंत्रणासोबतच असे गावा गावात घडणारे प्रकार मोठे आव्हान आहे. टाळेबंदी चारचा हा काळ नागरिकांसाठी परीक्षेचा आणि संयमाने वागण्याचा आहे.


कोरोनाच्या टाळेबंदी चारमध्ये परजिल्ह्यात, परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे परराज्यातून किंवा पुणे, मुंबई सारख्या जिल्ह्यातून हजारो नागरीक गाव जवळ करीत आहेत. पण पुणे, मुंबईहून आलेले नागरिकच कोरोनाबाधित निघत असल्याने प्रत्येकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती आहे. गावजवळ करणाऱ्या नागरिकांना गावा गावात प्रवेश नाकारला जात आहे. शेतातच रहा, कोठे तरी शेड मारून रहा, परत जा असेही सांगितले जात आहे. हा विरोध इतक्या टोकाला जात आहे की त्यातून खून, आत्महत्या, मारामाऱया सारख्या घटना घडल्या.

बोळेगाव (ता. निलंगा) येथे रविवारी (ता.२४) उत्तर प्रदेशातून आलेल्या एका व्यक्तीला शेतात क्वारंटाईन होण्यास सांगितले. याचा राग धरून त्याने नातेवाईकाच्या मदतीने दोघांचा खून केला. ढाकणी (ता. लातूर) येथे गावात येण्यास ग्रामस्थ व नातेवाईकांनी विरोध केल्याने पुण्याहून आलेल्या जावयाने शेतात आत्महत्या केली. मुंबई, पुण्याहून कोणी आले का हे विचारण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देवंग्रा (ता. चाकूर) येथे मारहाण झाली. नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य सेविकेला नेहरूनगर तांडा (ता. रेणापूर) येथे मारहाण करण्यात आली. मुंबईला हॉटेल व्यवस्थापनाचा पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला मावशीने गावाकडे येण्यास नकार दिल्याने तिला येथील सिद्धेश्वर मंदिराच्या निवारा कक्षात दीड महिन्याचा कालावधी काढावा लागला. अशा घटनांनी गावा गावात नवीन प्रश्न निर्माण होत आहेत.

या पुढील काळात हेच मोठे आव्हान राहणार आहे. कोरोनावर नियंत्रणासोबतच गावागावात प्रबोधनाची गरज आहे. कोरोना हा काही बरा न होणारा रोग नाही. लातूर जिल्ह्यातच सात वर्षांच्या मुलीने व ७० वर्षांच्या वृद्धाने इतर आजार असताना कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आला तरी गुन्हेगारासारखे त्याला न वागवता संयमाने वागण्याची गरज आहे.


कोरोनामुळे मनोसामाजिक आव्हान निर्माण झाले आहे. कलंक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. प्रत्येकाच्या मनात भीती आहे. समोरच्याच्या बाबतीत अविश्वास निर्माण होऊन संशयाने पाहिले जात आहे. असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने आक्रमकता वाढत आहे. अशातून या घटना घडत आहेत. बाहेरहून येणारे हे आपलेच बांधव आहेत. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावाकडे मानसिक, शारीरीक व आर्थिक आधार मिळेल म्हणून ते येत आहेत. कोरोना पसरवण्यासाठी नाही. असा आधार देणे आपले कर्तव्य आहे. हे समजून वागावे. कोरोनाला घाबरू नका. ९७ टक्के रुग्ण बरे होत आहेत. इतरांना वाळीत न टाकता काळजी घ्यावी.
- डॉ. आशिष चेपुरे, मनोविकृतीशास्त्र विभाग प्रमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com