एकतर्फी प्रेमातून तिच्यावर सपासप वार

कृष्णा भावसार
मंगळवार, 30 जून 2020

बाजारात आई आणि मैत्रिणीसह कपड्यांची खरेदी करण्यासाठी ती गेली. त्यानंतर खरेदी आटोपून ती मैत्रिणीसोबत घराकडे परतत होती. तेव्हा बाजार मैदानातून जात असताना नराधमाने काही कळायच्या आतच धारदार शस्त्राने  तिच्या गळ्यावर, पाठीवर, हातावर सपासप वार केले.

मंठा (जि.जालना) - एकतर्फी प्रेमाचे भूत अंगात संचारलेल्या नराधमाने पाच दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेवर भरदुपारी धारदार शस्त्राने सपासप वार केले. या घटनेत संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या निरागस मुलीचा जागीच मृत्यू झाला. मनाला हेलावून टाकणारी ही घटना मंठा शहरात मंगळवारी ( ता. ३० ) दुपारी घडली.

जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील येथील वैष्णवी नारायण गोरे (वय १८ ) हिला शाळेत असल्यापासून संशयित शेख अल्ताफ शेख बाबू हा एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. याबाबत तिच्या पालकांनी शेख अल्ताफच्या घरी माहितीही दिलेली होती. त्याच्या त्रासामुळे वैष्णवीचे दहावीनंतरचे शिक्षणही पालकांना थांबवावे लागले.

हेही वाचा : जालन्यात कोरोनाचा कहर सुरुच

दरम्यान, गेल्या शुक्रवारी ( ता. २६ ) मंठा येथे वैष्णवीचा जालन्यातील एका युवकासोबत विवाह झाला. परंपरेप्रमाणे धार्मिक कार्यक्रमानिमित्त ती मंठा येथे माहेरी आली होती. त्यातच मंगळवारी ( ता. ३० ) दुपारी बाजारात आई आणि मैत्रिणीसह कपड्यांची खरेदी करण्यासाठी ती गेली. त्यानंतर खरेदी आटोपून ती मैत्रिणीसोबत घराकडे परतत होती. तेव्हा बाजार मैदानातून जात असताना नराधम शेख अल्ताफ शेख बाबू याने तिला रस्त्यामध्ये अडविले. काही कळायच्या आतच धारदार शस्त्राने वैष्णवीच्या गळ्यावर, पाठीवर, हातावर सपासप वार करून तो पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात वैष्णवी पडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळाची अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार, पोलिस उपविभागीय अधिकारी सोपान बांगर यांनी पाहणी केली. पोलिस पथकाने संशयित अल्ताफ यास रात्री उशिरा ताब्यात घेतले. या पोलिस पथकात पोलीस निरीक्षक विलास निकम, फौजदार नितीन गुट्टूवार, फौजदार विजय जाधव, पोलिस कर्मचारी अण्णा लोखंडे, रवि बिरकायलू, प्रशांत काळे, शंकर राजाळे, शेख इम्रान यांचा सहभाग होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young woman in Mantha