फायनन्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा खून, औरंगाबादेतील घटना. 

प्रकाश बनकर 
Wednesday, 21 October 2020

मित्र घरी आल्यावर प्रकार उघडकीस 

औरंगाबाद : खाजगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. पडेगांव परिसरातल्या मिटमिटा भागात बुधवारी (ता.२१) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मॉन्टी बिहारी ऊर्फ मंतूस अनिलकुमार सिंग (३६) असे मृताचे नाव आहे. मॉन्टीचा मित्र घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दोन दिवसांपूर्वीच मारेकऱ्याने मॉन्टीची हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या विषयी छावणी पोलिसात गुन्हा दाखल झाला. तर मॉन्टी हा पॅंथर संघटनेचे देखील काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगीतले.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मुळचे बिहार येथील रहिवासी असलेले मॉन्टी सिंग आणि त्याचा भाऊ अमितसिंग यांच्यात वडिलोपार्जित संपत्तीतून बऱ्याच दिवसांपासून वाद आहे. मॉन्टी सिंग हा वंडर स्कूलचे मालक सुनील पालवे यांच्या पिस होम्स या फ्लॅटमध्ये काही दिवसांपासून राहत होता. त्याचा मित्र बबलू हा तीन दिवसांपूर्वी त्याची कार घेऊन गेला होता. तो बुधवारी(ता.२१) सकाळी साडेदहाच्या सुमारास कारची चावी देण्यासाठी आला असता दरवाजा आतून बंद होता. प्रतिसाद न मिळाल्याने व घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने बबलूला संशय आला. त्याने तातडीने छावणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा मॉन्टी सिंग हा सोफासेटवर मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्यावर चाकूचे वार होते. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे, छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांच्यासह श्वान पथक, फाँरेन्सिक पथक, सोसायटीमध्ये दाखल झाले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आठवड्यापूर्वी मित्रांशी झाले होते भांडण 
मॉन्टी हा पँथर संघटनेचे काम करत होता. यासह एका खाजगी फायनान्स कंपनीत वसूलीचे काम करीत होता. तसेच तो प्लॉटींगचाही व्यवसाय करायचा. आठवड्यापूर्वी त्याचे मित्रांसोबत भांडण झाले होते. शिवाय त्याचे मोठ्या भावासोबतही फारसे जमत नसल्याचही माहिती समोर आली आहे. तो विवाहीत होता. त्याला एक मुलगी आहे. खून झाला, त्या ठिकाणी पत्नी राहत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या युवकाचा दारु पाजून खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून करणारा हा मृताच्या अत्यंत जवळचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder youth Aurangabad news