गेवराईचा प्रल्हाद लोखंडे, लाच घेताना असे वापरले फंडे, अखेर एक लाख घेताना अटकेत...

वैजिनाथ जाधव 
बुधवार, 29 जानेवारी 2020

बीड जिल्ह्यातील गोदापात्र महसूलमधील खादाड अधिकाऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. महसूल प्रशासन कारवाईचा देखावा करते अन्‌ नंतर वाळूचे पकडलेले वाहन सोडविण्यासाठी हातसफाई करून घेत असल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला आहे. 

गेवराई (जि. बीड) - अवैध वाळू वाहतूक करताना कारवाई करून पकडलेला ट्रक सोडण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार व एक अन्य एकास बुधवारी (ता. 29) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

प्रल्हाद लोखंडे असे नायब तहसीलदाराचे नाव असून माजेद शेख हा खासगी व्यक्ती आहे. तालुक्‍यातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक नित्याचीच आहे. अलीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने महसूल विभाग कारवायाचा देखावा करत आहे.

हेही वाचा - निर्बल पुरुषांनाही कसा होतो कच्च्या केळीचा फायदा, वाचा...

त्यातच कारवाई करत पकडलेला वाळूचा एक ट्रक सोडण्यासाठी नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे याने एक लाख रुपयांची लाच मागितली. संबंधिताने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. 

हेही वाचा - टीकटॉक कलाकारांचा बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय मेळावा, आजीबाईही...

दरम्यान, बुधवारी गेवराईत रक्कम देण्याचे ठरले. त्यावरून सापळा रचण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे व त्याचा खासगी साथीदार माजेद शेख या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naib Tahsildar Arrested In Beed District