नांदेडला आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी स्वीकारला पदभार

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुनील लहाने यांनी मंगळवारी (ता. सात एप्रिल) पदभार स्विकारला. यावेळी त्यांचे महापालिकेत स्वागत करण्यात आले. सध्या आपण कोरोनावरील उपाययोजनांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. सुनील लहाने यांनी मंगळवारी (ता. सात) पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले. कोरोनामुळे सध्या आपण त्यावरील उपाययोजना आणि अंमलबजावणीकडे लक्ष देणार असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. 

मीरा भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या डॉ. सुनील लहाने यांची नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी काढले होते. त्यानुसार डॉ. लहाने यांनी पदभार स्विकारला.

हेही वाचा - सेवाभावी संस्थांचा मदतीसाठी नांदेडमध्ये पुढाकार

महापालिकेत झाले स्वागत
डॉ. सुनिल लहाने हे नांदेडला सोमवारी (ता. सहा) सायंकाळी आले आणि त्यानंतर मंगळवारी (ता. सात) त्यांनी महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. या वेळी त्यांचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, विलास भोसीकर, सुधीर इंगळे आणि शुभम क्यातमवार यांनी स्वागत केले. त्याचबरोबर दिवसभरात इतर अधिकारी, विभागप्रमुख आणि पदाधिकारी यांनीही स्वागत केले. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. लहाने यांनी नांदेड महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या संदर्भाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर अधिकारी आणि विभागप्रमुखांशीही चर्चा केली.

डॉ. लहाने यांचा परिचय
डॉ. सुनील लहाने हे मूळचे माकेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील रहिवासी आहेत. त्यांनी परभणीच्या पशुशल्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९८ मध्ये मुख्याधिकारीपदी निवड झाली. त्यांनी आतापर्यंत पैठण, वसमत, लोणावळा, इस्लामपूर या नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर अहमदनगर, वसई विरार, कल्याण डोंबिवली महापालिकेत उपायुक्त तसेच वरळी, मुंबईच्या नगरपालिका प्रशासन संचालनालयात उपसंचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत ते कार्यरत होते. आता मंगळवारपासून त्यांनी नांदेड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हे ही वाचलेच पाहिजे - हुश्श... ऽऽऽ ‘त्या’ १२ जणांचे ‘स्वॅब’ निगेटीव्ह

कोरोनामुळे तूर्त घरातच राहण्याचे आवाहन
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच बसून रहावे आणि अत्यावश्‍यक असेल तरच एकानेच घराबाहेर पडावे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. लहाने यांनी केले आहे. सध्या माझी प्राथमिकता कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर राहणार आहे. त्याचबरोबर शहरातील आरोग्य सुविधा, स्वच्छता व साफसफाई तसेच नियमित पाणीपुरवठा याकडे विशेष लक्ष राहणार नाही. नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठीदेखील उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Commissioner Dr. Sunil Lahane took over, Nanded news