नांदेड जिल्ह्याला मिळाले २६९ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

0- अतिवृष्टीधारकांच्या खात्यावर होणार जमा
0- १२३ कोटींचा पहिला हप्ता यापूर्वीच वाटप
0- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची माहिती

नांदेड :  ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला १२३ कोटींच्या पहिल्या हप्त्याचे वितरण नुकतेच झाले. यानंतर शासनाने शुक्रवारी (ता. १३) जिल्ह्यासाठी २६९ कोटी आठ लाखांचा दुसरा हप्ता वितरीत केला आहे. यातून प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे. हा निधी लगेच सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यात बाधित झालेल्या सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ५०७ कोटींची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर आठ हजार रुपये भरपाई देण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला १२३ कोटी १४ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. हा निधी जिल्हास्तरावरून सोळा तालुक्यांना वितरित करण्यात आला होता.

हेही वाचा--शासकीय यंत्रणेत शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास घट्टच

हा निधी ता. २८ नोव्हेंबरपर्यंत वाटप केल्यानंतर दुसऱ्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती. यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाकडून शुक्रवारी (ता. १३) शासन आदेश जारी करण्यात आला. यात राज्यासाठी साडेचार हजार कोटी रुपये वितरीत केल्याचे म्हटले आहे. यापैकी नांदेड जिल्ह्यासाठी २६९ कोटी आठ लाख रुपयाचा दुसरा हप्ता वितरीत होणार आहे. हा निधी लगेच सोळा तालुक्यांना वितरीत करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले.

येथे टच करा--काय आहे बंजारा हस्तशिल्प कला..? जाणून घ्या..

मराठवाड्यासाठी १७९१ कोटी

औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यासाठी एक हजार ७९१ कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरीत केला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडून मिळालेला निधी शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करावेत, असे निर्देश दिले आहेत. यात औरंगाबादसाठी २६६ कोटी, जालना २४० कोटी, बीड ३१५ कोटी, लातूर २२० कोटी, उस्मानाबाद १७० कोटी, नांदेड २६९ कोटी, परभणी १९१ कोटी व हिंगोली ११७ कोटींचा समावेश आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded district received Rs. 269 crore