नांदेडला आता समन्वयासोबत नियोजनाची गरज

file photo
file photo

नांदेड - कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नांदेड शहर आणि जिल्ह्यात अद्याप सापडला नाही, हे नांदेडकरांसाठी सुदैव असले तरी यापुढे देखील आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. आता आणखी पुढील काही दिवस महत्वाचे असून नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची तितकीच आवश्‍यकता आहे. 

जगभरातील अनेक देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यात भारतासोबत महाराष्ट्रही आहे. राज्यातही अनेक जिल्ह्यात कोरोना आला असून मराठवाड्यात देखील आता रुग्ण सापडू लागले आहेत. नांदेड आणि परभणी हे दोन जिल्हे वगळता इतर औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

नांदेडला अद्याप रुग्ण नाही
नांदेड शहर आणि जिल्ह्यात सुरवातीपासूनच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी लक्ष घातले तसेच त्यांना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सहकार्य केले. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तरी देखील आगामी काळात रुग्ण सापडू नये, यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी देखील त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. 

अन्नधान्याचे व्हावे योग्य वाटप
केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आता मुबलक प्रमाणात गहू, तांदूळ, डाळ आदी किराणा सामान नांदेडला आले आहे. आता ते योग्य लाभार्थीपर्यंत जाण्यासाठी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न झाले पाहिजेत. कारण गेल्या १५ दिवसांपासून हाताला काम नसल्याने आणि ज्यांचे हातावर पोट आहे, अशांची संख्या शहर आणि जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे अशा घटकांपर्यंत हे धान्य पोहचण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. 

समन्वय आहेच पण नियोजनही हवे
आत्तापर्यंत जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाने समन्वय ठेवल्यामुळे अनेक समस्या सुटल्या आहेत. रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे तसेच नागरिकांमध्येही जनजागृती झाली आहे. त्याचबरोबर पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही आपआपले राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मदत करण्यात सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गुरुद्वारा, लॉयन्स क्लब आदींसह सेवाभावी संस्था, संघटना तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक आदी मंडळीनीही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे गोरगरीब आणि गरजूंना मदत होत आहे. 

वंचित, गरजूंना प्राधान्य हवे
मात्र, मदत करत असताना काही जण त्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. सगळ्यांची मदत एकाच ठिकाणी किंवा एकाच भागात गेली तर दुसरीकडे गरजू वंचित राहतील. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची आणि समन्वय ठेवण्याची गरज आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होता कामा नये. नाहीतर काही जण तुपाशी आणि काही जण उपाशी राहू शकतात. त्यामुळे अशा गरजू आणि वंचितांकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com