युती, आघाडीची नुसती चर्चा

अभय कुळकजाईकर
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नांदेड - जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ आली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीसाठी तर शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसाठी नुसतीच चर्चा सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणीच आघाडी किंवा युती जाहीर केली नाही. जागा वाटपाचा तिढा कायम असून दुसरीकडे मात्र इच्छुक उमेदवारी कधी जाहीर होणार, या प्रतीक्षेत आहेत.

नांदेड - जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ आली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीसाठी तर शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसाठी नुसतीच चर्चा सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणीच आघाडी किंवा युती जाहीर केली नाही. जागा वाटपाचा तिढा कायम असून दुसरीकडे मात्र इच्छुक उमेदवारी कधी जाहीर होणार, या प्रतीक्षेत आहेत.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात आघाडीसाठी दोन्ही पक्ष अनुकूल असून स्थानिक पातळीवर चर्चा होऊन निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. त्याचबरोबर जातीयवादी पक्षांना बाजूला सारण्यासाठी आघाडीचा पर्याय सक्षम ठरू शकतो, अशी पुष्टीही जोडली होती. मात्र त्यालाही तीन दिवस उलटले तरी अजून आघाडीची बोलणी झाली नाही. एकीकडे कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाण म्हणतील तोच निर्णय अंतिम तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये गट, तटामुळे आघाडीबाबत द्विधा मनःस्थिती. त्यामुळे अशा परिस्थितीत आघाडी कशी होणार? हाही प्रश्नच आहे.

खरे तर नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत पहिल्यापासूनच सौख्य नाही हे सर्वांनाच ख्यात आहे. त्याचबरोबर मागील निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते.

जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे भाजपची दुय्यम भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्यातही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. सेना व भाजपच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन सामंजस्याची भूमिका घेत युती जाहीर केली असली तरी जागा वाटपही झाले नाही अन्‌ कोणाची उमेदवारी जाहीर नाही. त्यामुळे युती होणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी (ता. 27) सुरवात होणार असून त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारी सुरू केली असून आता उमेदवारी केव्हा जाहीर होणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी असला तरी अजूनपर्यंत एकाही पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. जो तो पक्ष दुसऱ्याची यादी केव्हा जाहीर होणार? याकडेच लक्ष ठेऊन आहे.

Web Title: nanded zp election