सरकारने सांस्कृतिक चळवळीला बळ द्यावे : वाचा कोण म्हणाले...

सुशांत सांगवे
Wednesday, 29 January 2020

नृत्याच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या डॉ. स्वाती दैठणकर, शमा भाटे आणि मनिषा साठे या तीन नृत्यगुरू लातूरात आल्या आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची भेट त्या घेणार आहेत.

लातूर : शास्त्रीय संगीताचे महोत्सव केवळ पुण्या-मुंबईतच होतात. शास्त्रीय संगीत, नृत्य रूजवायचे असेल, कलाकारांबरोबरच चांगला रसिक तयार करायचा असेल तर हे महोत्सव आता राज्यातील लहान-लहान शहरांपर्यंत घेऊन जायला हवे. सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक शहरांत संगीत महोत्सव किंवा संगीत स्पर्धा घ्याव्यात. केवळ संगीत अन्‌ नृत्याला वाहिलेले संकुलही सरकारने राज्यात ठिकठिकाणी उभे करावेत. अशा पोषक वातावरणातून नक्कीच कलात्मक जाण वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नृत्यगुरूंनी येथे व्यक्त केली.

नृत्याच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या डॉ. स्वाती दैठणकर, शमा भाटे आणि मनिषा साठे या तीन नृत्यगुरू लातूरात आल्या आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची भेट त्या घेणार आहेत. अष्टविनायक प्रतिष्ठान तर्फे आयोजित राष्ट्रीय संगीत आणि नृत्य स्पर्धेत त्या परिक्षक म्हणूनही सहभागी झाल्या आहेत. यानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांस्कृतिक चळवळ राज्याच्या सर्व भागांत रूजणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधून घेतले.

कलांचा आस्वाद घेण्याची वृत्ती वाढावी

डाॅ. स्वाती दैठणकर (नृत्यगुरू) : नवीन पिढी भरकटत आहे. त्यांच्याकडे चांगली पुस्तके वाचायला वेळ नाही. त्यांना जर शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, शास्त्रीय नृत्याचा सांस्कृतिक ठेवा पहायला मिळाला तर त्यातून नव्या पिढीवर चांगले संस्कार होतील. कारण शास्त्रीय संगीत, नृत्य हे भारतीय संस्कृतीची संस्कार केंद्र आहेत.

क्लिक करा - आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

पुस्तकाची तुलना केली तर एका नृत्याचा पाहणाऱ्यावर दहा पटीहून अधिक सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा कलांच्या सानिध्यात नव्या पिढीला आणले पाहीजे. यातून कलांचा आस्वाद घेण्याची वृत्ती वाढेल. कला ही कष्टसाध्य आहे, हेही समजेल. यासाठी सरकारने सांस्कृतिक चळवळीला बळ दिले पाहीजे.

...हे पुढच्या पिढीसाठी गरजेचे

शमा भाटे (नृत्यगुरू) : लातूरमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय संगीत आणि नृत्य स्पर्धेत अत्यंत दर्जेदार कला तरुणाईने सादर केली. हे तरुण देशाच्या वेगवेगळ्या भागातून आले होते. तसे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलही होते. त्यामुळे तरुणाईला घडवायचे असेल तर असे महोत्सव किंवा अशा स्पर्धा राज्यात ठिकठिकाणी घेणे गरजेचे आहे.

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

त्या-त्या भागातील विद्यार्थ्यांना चांगले गुरू मिळणे हेही तितकेच गरजेचे आहे. स्वत:च्या पायावर उभे असलेल्या नृत्य संस्था, संगीत संस्थांनाही आधार मिळाला पाहीजे. त्यामुळे त्या दृष्टीनेही सरकारने प्रयत्न करायला हवेत. पुढच्या पिढीसाठी हे गरजेचे आहे.

प्रयत्नांतून कलेची गोडी वाढेल

मनिषा साठे (नृत्यगुरू) : शास्त्रीय गायन-वादन, शास्त्रीय नृत्य हे अद्याप लहान-लहान शहरांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोचले नाही. या कलेत रस उत्पन्न होईल, असे प्रयत्न आता व्हायला हवे. त्यासाठी सरकारने सर्व भागांत महोत्सव घ्यावेत किंवा दर्जेदार संगीत मैफली आयोजित कराव्यात. अशा ठिकाणी गुरू आणि शिष्य एकत्र येतील, हेही पहावे.

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

अशा प्रयत्नांतून नक्कीच शास्त्रीय संगीताबाबतची गोडी नक्कीच वाढेल. नृत्यशैली काय असते, त्यात कोणकोणते प्रकार आहेत, रागांची नावे काय आहेत, कोणत्या वेळेत कोणते राग गायले जातात... अशी प्राथमिक माहिती मिळेल. यातून रसिक तयार होण्यासही मदत मिळेल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Music Dance Competition Latur News