मी राजीनामा देणार नाही, राष्ट्रवादीच्या आमदाराचा यू टर्न...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देऊन शांत जीव जगण्याचा संकल्प केला होता. मात्र, ज्येष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर मी राजीनामा देणार नाही, असे सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.

बीड - राजकारणाचा किळस आल्यामुळे आता बाजूला व्हायचे ठरविले आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन पुढील आयुष्य शांतपणे जगणार, अशी उद्वीग्न भावना व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची किळस एकाच दिवसात दूर झाली आहे. दुपारपर्यंत राजीनामा देणारच, असे म्हणणाऱ्या सोळंके यांनी "राजीनामा देणार नाही' असा युटर्न घेतला आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंगळवारी (ता. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे आणि सोळंके यांची बंद खोलीत चर्चा झाली आणि सोळंके यांना आलेली राजकीय किळस दूर झाली. आमदारकीची चौथी टर्म असलेले प्रकाश सोळंके या वेळी माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले. त्यांनी आघाडी सरकारमध्ये महसूल, भूकंप व पुनर्वसन, पणन, सहकार अशा खात्यांचे मंत्री म्हणूनही काम केले. त्यामुळे सिनिअरिटी आणि अनुभव या जोरावर मंत्रीपद मिळावे, अशी प्रकाश सोळंके यांना अपेक्षा होती. मात्र, डावलल्याने सोळंके नाराज होते.

हेही वाचा- भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

सोमवारी (ता. 30) सायंकाळीच त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा थेट बोलून दाखविली होती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. 31) मतदारसंघातील समर्थकांनी पुणे येथे त्यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनवणी केली. मात्र, सोळंके राजीनामा देणारच या भूमिकेवर ठाम होते. दरम्यान, त्यांच्या राजीनामा देण्याच्या भूमिकेची पक्षानेही फारशी दखल घेतली नव्हती, अशी माहिती आहे.

हेही वाचा - आता निर्णय धनंजय मुंडेंच्या हाती

पण, जिल्ह्यातील एका माजी आमदाराने दोन्ही पवारांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्ष कार्यालयात काही वेळ सोळंके यांची धनंजय मुंडे व जयंत पाटील यांनी विनवणी केली. पुन्हा काही वेळाने अजित पवार दाखल झाले. त्यानंतर बंद खोलीत काही वेळ झालेल्या बैठकीनंतर "राजीनामा देणार नाही' असा निर्वाळा प्रकाश सोळंके यांनी दिला. दरम्यान, त्यांना राजकारणाची आलेली किळस घालविण्यासाठी नेत्यांनी त्यांना कोणते औषध दिले हे मात्र अद्याप उघड झाले नाही. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

मतदारसंघातील प्रकल्प मार्गी लागणार ः सोळंके 
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसने सन्मानाने मंत्रीपद द्यायला पाहिजे होते. सुरवातीला पक्षश्रेष्ठींनी मंत्रीपद देण्याचा निर्णय केला होता; परंतु ऐनवेळी अडचणी आल्यामुळे संधी मिळत नसल्याने नाराज झालो. पक्षाच्या विरोधात न जाता सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु बैठकीमध्ये मराठवाड्यासह माजलगाव मतदारसंघाचा दुष्काळ हटविण्यासह विवीध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे पक्षश्रेष्ठींनी सांगितले. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's MLA will not resign