तुरीवर आता नवे संकट; मर रोगाने जातेय वाळून, शेतकऱ्यांची चिंता वाढली

विवेक पोतदार
Sunday, 6 December 2020

जळकोट तालुक्यात खरिपात सततच्या पावसाने विविध पिकांचे नुकसान केल्यानंतर तुरीवर भिस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या या पिकावर नवे संकट आले असून मर रोगाने तुरीचे पिक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे.

जळकोट (जि.लातूर) : जळकोट तालुक्यात खरिपात सततच्या पावसाने विविध पिकांचे नुकसान केल्यानंतर तुरीवर भिस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या या पिकावर नवे संकट आले असून मर रोगाने तुरीचे पिक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. विविध पिकांना पावसाळ्यात जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यानंतर खरिपातील सर्वात शेवटी येणारे जास्त कालावधी लागणारे तुरीचे पिक बहरलेले असताना त्यावर कीड व अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यावर महागड्या कीटकनाशकांचा मारा केल्यानंतर हे पिक काही प्रमाणात सावरले असताना अचानक हे पिक शेतकऱ्यांच्या भाषेत उधळत आहे.

उधळणे म्हणजे तुरीचे पिक बुडापासून वाळणे होय. यालाच मर रोगाचा प्रादुर्भाव म्हणतात, असे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तालुक्यात अनेक गावांत अचानक बहरात आलेली तूर मोठ्या प्रमाणावर वाळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उमरदरा (ता.जळकोट) येथील शेतकरी पंडितमामा गुट्टे यांनी शिवारात पिक वाळत असल्याचे सांगितले. शेतकरी अडचणीत सापडले असून शासनाने पंचनामे करुन विमा मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हे पिक पट्टे टाकून विविध पिकांत आंतरपिक म्हणून घेतले जाते.

अनेक शेतकरी तुरीला सिंचनाखाली आणून मोठे उत्पादन घेतात. शेतकऱ्यांची खरिपातील अनेक पिके गेली तरी तुरीचे उत्पादन घेऊन आधार मिळवतात. परंतु या वर्षी हे पिक पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याने मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून डोळ्यात पाणी उभारले आहे. ऐन बहरातील पिकावर हे नवे संकट उभारले आहे. यावर सध्या तरी कोणता उपाय नसून पिक पद्धतीत पुढील वर्षी बदल करावा लागणार असून मागे पडलेल्या जास्तीच्या पावसाने वावरात पाणी साचून ते त्यात मुरले व बुरशी वाढून आता त्याचा हा परिणाम होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी पवार यांनी सांगितले. त्यांनी तालुक्यातील शिवारात भेटी देऊन तुरीच्या पिकाची पाहणी करुन शेतकर्यांशी संवाद साधला असून याबाबतच्या नुकसानीबाबतचा अहवाल वरिष्ठांना कळवणार असल्याचे सांगितले.

 

तालुक्यात तुरीवर मर रोग आल्याने पिक वाळून जात असून मोठे नुकसान होत आहे. याबाबत लातूर येथे शास्त्रज्ञांशी याबाबत बोलून माहिती घेतली असता जास्त पाऊस झाल्याने पाणी साचून बुरशी वाढते. त्याचे आता हा परिणाम दिसत आहे. सध्या यावर ठोस उपाय नाही. एखादी बुरशीनाशक फवारणी करावी, परंतु पुढील वर्षी हे टाळण्यासाठी जमिनीवर तेच ते पिक घेऊ नये. बदलून तुर पेरणी करावी. तसेच मातीपरीक्षण करुन बीजप्रक्रिया करुन पेरणी करावी. नुकसानीबाबत लवकरच वरिष्ठांना अहवाल देणार आहे.
- आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी, जळकोट

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Crises On Tur Crop In Jalkot Block Latur News