esakal | नवीन वर्षात तब्बल चार महिने सुट्या! 
sakal

बोलून बातमी शोधा

holiday.jpg

राज्य शासनाकडून वर्ष २०२१ च्या ‘हॉलिडे’ची यादी जाहीर 

नवीन वर्षात तब्बल चार महिने सुट्या! 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : कोरोनाच्या कटू आठवणींसह हे वर्ष मावळतीला आले आहे. नवीन वर्षारंभ होण्यासाठी केवळ एक महिना उरला आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२१ वर्षातील १९ सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या आहेत. वर्षभरातील ५२ रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर पाच सुट्या, दिवाळीच्या सुट्या अशा एकूण १२५ दिवस म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या सुट्यांची नवीन वर्षात चाकरमान्यांना पर्वणी राहणार आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने रविवारी व शनिवारी सुटी असते. त्यामुळे शनिवार व रविवार म्हटले की कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यात कार्यालयीन कामापासून सुटकेचे दिवस असतात. या दिवसांत छंद जोपासत विरंगुळा मिळविण्याचा बहुतांश जणांकडून प्रयत्न होत असतो. अनेकजण घरातील कामे पूर्ण करतात तर काहीजण सुटीचा दिवस मौजमजेत घालवून आनंद घेतात. त्यामुळे शनिवार-रविवार हे कर्मचाऱ्यांचे आवडीचे दिवस असतात. याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय सण व स्थानिक प्रशासनाच्या सुटीकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. कार्यालयीन सुट्यांचा ताळमेळ बसवून शासकीय सुट्यांचा आनंद घेण्याचा प्रयत्नही अनेक जणांकडून आवर्जून होतो. पण, यंदा रविवारी पाच सुट्या आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोडही झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सलग तीन दिवस सुट्या अशा 
नव्या वर्षाची सुरवात शुक्रवारने होणार असून, प्रजासत्ताकाची वर्षातील पहिली शासकीय सुटी २६ जानेवारीला मिळणार आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. या दिवशी शुक्रवार असल्याने त्यानंतर शनिवार, रविवार अशा सलग तीन सुट्या मिळणार आहेत. २९ मार्चला होळीची सुटी सोमवारी आल्याने यामध्येही तीन दिवस सलग सुटी मिळणार आहे. याशिवाय दोन एप्रिल, सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी व ऑक्टोबरमध्ये दसरा शुक्रवारी आल्याने तेव्हाही सलगच्या सुट्यांचा आनंद सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिवाळीच्या सणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दिवाळी साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीपूजन गुरुवारी, बलिप्रतिपदा शुक्रवारी व पुढील दोन दिवस असे चार दिवसांची सुटी सलगपणे उपभोगता येणार आहे. त्याच महिन्यामध्ये गुरुनानक जयंतीची सुटीही शुक्रवारीच आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाने वाईट गेले २०२० 
वर्ष २०२० हे कोरोनाच्या प्रभावाने अत्यंत भीतीचे व त्रासदायक गेले. त्यामुळे नवीन वर्षतरी ताण-तणावापासून मुक्त असावे, यासाठी अनेकजण नियोजन करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असली तरी अजूनही जिल्ह्यासह राज्यामध्ये त्याचा प्रभाव दिसत नसल्याचे चित्र आहे; तरीही अजूनही भीती गेलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वर्ष २०२० मध्ये २२ मार्चपासून आजपर्यंत राज्यातील नागरिक कोरोनाच्या दहशतीखाली असल्याने मनसोक्त जगता आले नाही. पण, येणारे वर्ष आनंदाने घालविण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. त्या दृष्टीने अनेकांनी आतापासूनच सुट्यांचे नियोजन केले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image