पूर्वी दोनदा गर्भपात, आता सात महिन्यांची गर्भवती, तरीही कोरोनाविरुद्ध मैदानात

Dr. News about Rachna Mote's work
Dr. News about Rachna Mote's work

बीड - आई होणे हे प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर शेवटच्या तीन महिन्यात आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी भावी माता आराम करते. डॉक्टर, कुटुंबीय तिला आराम करण्याचा, ताण-तणाव न घेण्याचा सल्ला देतात. पण, सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. स्वतः सात महिन्याची गर्भवती असताना त्या या लढ्यात भर उन्हात आरोग्य तपासणी करीत आहेत. विशेष म्हणजे पाच महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर त्यांची गर्भपिशवीला टाक्याची (सर्व्हायकल इनसर्कलेज) शस्त्रक्रिया झालेली आहे. तरीही कोरोना निरोगी समाजासाठी त्या मैदनात उरल्या आहेत. डॉ. रचना मोटे असे त्यांचे नाव.

आयुर्वेदातील वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर रचना सहा महिन्यांच्या परिविक्षाधीन कालवधीसाठी जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या. त्यांचा परिविक्षाधिन कालावधी सुरू असतानाच कोरोना विषाणूने थैमान घातले. यामुळे डॉ. रचना मोटे यांची सेवा समुदाय आरोग्य अधिकारी पदावर वर्ग करुन त्यांना निपाणी जवळका (ता. गेवराई) आरोग्य केंद्रात वर्ग करण्यात आली. दरम्यान, हा विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी अशा उपायांची योग्य अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु होती. परंतु, पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा शहरांतून जिल्ह्यात येणाऱ्यांसह ऊसतोड मजूरांची जिल्ह्यात येणारी संख्या मोठी आहे. बाहेरुन येणाऱ्यांची जिल्ह्याच्या चेकपोस्टवर पोलिस तपासणीसह प्राथमिक आरोग्य तपासणीचा पॅटर्नही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातच राबविला गेला.

त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केलेल्या दिड लाख लोकांची तपासणी करुनच त्यांना जिल्ह्याची वेस पार करता आली. दरम्यान, औरंगाबादहून बीडला प्रवेश करणाऱ्या शहागड चेकपोस्टवर डॉ. रचना मोटे यांची ड्युटी लागली आहे. सध्या ४२ अंशांहून अधिक तापमानात त्या भर उनात आरोग्य तपासणी करत आहेत. विशेष म्हणजे त्या सात महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्याहून विशेष म्हणजे यापूर्वी त्यांचा दोन वेळा विविध कारणांनी गर्भपातही झालेला आहे.

याखेपेलाही पाचव्या महिन्यानंतर गर्भपिशवीला टाक्याची शस्त्रक्रीया करण्यात आलेली आहे. तरीही त्या आपल्या कर्तव्यापासून हटलेल्या नाहीत. गर्भावस्थेचे कारण सांगून त्यांना रजाही घेता आली असती परंतु जेव्हा देशाला आपली गरज आहे तेव्हा आपण स्वत:चा विचार कसा करणार, अशी भावना डॉ. रचना योगेश मोटे यांनी व्यक्त केली. अशा जिवावर उदार होऊन कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांमुळेच कोरोनाला बीडची वेस पार करता आलेली नाही.
 

सात महिन्यांची गर्भवती या कारणाने मला वैद्यकीय रजाही घेता आली असती. परंतु, माझ्या वैद्यकीय शिक्षणाची देशाला गरज आहे. तशी शपथ मी पदवी घेताना घेतलेली आहे. 
- डॉ. रचना योगेश मोटे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com