‘सुकून’ पाहणाऱ्याने वीस जणांना दिला कोरोनाचा ‘प्रसाद’

विकास गाढवे
Monday, 6 July 2020

बाधिताने दिलेले फुंकर मारलेले लिंबू, कूंकू खाल्ल्याने वीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार घडला. सुकून बघणाऱ्या, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या संबंधित आराध्यावर साथरोग प्रतिबंध कायद्यासह जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देशमुख व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

लातूर : ‘सुकून’ बघण्याच्या पद्धतीतून एका आराध्याने (देवीची गाणी गाणारा) लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारली. देवीचा प्रसाद म्हणून भाविकांनी हे लिंबू, कुंकू खाल्ले. त्यातून सारोळा (ता. औसा) येथील तीन कुटुंबांतील वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.

औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी यांनी सोमवारी (ता. सहा) आढावा बैठकीत ही माहिती देताच पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी हा प्रकार ऐकून थक्क झाले. सकून बघणाऱ्या, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या संबंधित आराध्यावर साथरोग प्रतिबंध कायद्यासह जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देशमुख व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना लोक स्वतःत काहीच बदल करण्यास तयार नाहीत. अनलॉक एकपासून तर कोरोनाची साथ संपुष्टात आल्यागत लोकांनी पूर्वीसारखेच जीवन जगणे सुरू केले आहे.

यामुळे लॉकडाऊनमुळे स्थगित केलेले घरगुती धार्मिक कार्यक्रम गुपचूप आटोपण्यावर लोक भर देत आहेत. यातूनच ग्रामीण भागात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या अंधश्रद्धाही उफाळून आल्या आहेत. याचाच परिणाम सारोळा येथील वीस जणांना कोरोनाची लागण झाली. एवढ्या लहान गावात २३ कोरोनाचे रूग्ण दिसल्यानंतर पालकमंत्र्यांनी उत्सुकतेपोटी चौकशी केली. त्यावर तहसीलदार पुजारी यांनी दिलेली माहिती सर्वांनाच धक्का देणारी ठरली.

हेही वाचा : जालन्यात चार कोरोनाबळी

लातूरच्या खासगी रूग्णालयात काही दिवस उपचार घेऊन एक व्यक्ती २२ जूनला रोळा येथे आली. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने पुन्हा लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे २५ जूनला त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्यात आली. यात आराधीचे गाणे गाणाऱ्या एका व्यक्तीने देवीच्या नावाखाली आजारी व्यक्तीचे हातपाय चेपणे, बाम लावणे आदी काम केल्याचे पुढे आले. तपासणीत या आराधीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे दिसले. 

परडी भरण्याचा कार्यक्रम 
मोठ्या प्रमाणात लोकांच्या संपर्कांत आल्याच्या कारणांची चौकशी केल्यानंतर आराधीने २३ जूनला रात्री उशिरा दोन ठिकाणी परडी भरण्याचा कार्यक्रम केल्याचे उघड झाले. या कार्यक्रमांतून संपर्कात आलेल्यांची तपासणी केल्यावर तीन कुटुंबांतील तब्बल वीस जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळल्याने हासेगाव (ता. औसा) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष हिंडोळे यांनी खोलवर चौकशी केली.

त्यात सकून बघण्याच्या आपल्या कार्यपद्धतीतून आराधीने तोंडावाटे फुंकर मारलेले लिंबू व कुंकू भाविकांना खायला दिल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला. या अघोरी प्रकारानेच सर्वांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस पाटलांनी आराधीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार औसा पोलिसांनी दोन जुलैला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे तहसीलदार पुजारी यांनी सांगितले. दरम्यान, अडलेले काम, जुना आजार किंवा इच्छापूर्तीसाठी ‘बाबा’जी किंवा तत्सम जाणकाराकडे अंधश्रद्धतेतून सल्ला मागण्याच्या प्रकाराला सुकून म्हणतात. हा प्रकार ग्रामीण भागात अजुनही चालतो. 

साखळी तोडण्यात यश 
दरम्यान सुरूवातीला कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचा २९ जूनला मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील एक रूग्ण व्हेंटीलेटरवर असला तरी त्याची प्रकृती चांगली आहे. तर आराधीसह त्याच्या संपर्कातील सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. हिंडोळे यांनी सांगितले.

तोंडावाटे फुंकर मारलेले लिंबू खाल्ल्यानेच वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाने वीस जणांच्या संपर्कांतील लोकांचा शोध घेतला. त्यांची तपासणी करून त्यांचे गरजेप्रमाणे विलगीकरण, अलगीकरण केले. त्यामुले सारोळ्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश आल्याचे डॉ. हिंडोळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Latur