esakal | कर्जमुक्ती योजनेची यादी महिनाअखेर जाहीर होणार

बोलून बातमी शोधा

File photo

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे. आतापर्यंत नियोजनानुसार कामकाज पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असून, याद्या प्रसिद्धीचे नियोजन करण्यात आले आहे. शिवजयंती, महाशिवरात्रीनंतर शनिवार व रविवार या दिवशी सुटी असूनही कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून कर्जमुक्ती योजनेचे कामकाज पूर्ण करावे, असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

कर्जमुक्ती योजनेची यादी महिनाअखेर जाहीर होणार
sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या कामकाजासाठी सहकार विभागाने क्षेत्रीय कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिल आहेत. शिवजयंती, महाशिवरात्रीनंतर शनिवार व रविवार या दिवशी सुटी असूनही कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून कर्जमुक्ती योजनेचे कामकाज पूर्ण करावे, असे आदेशात म्हटले आहे. 

ठाकरे सरकारची पहिली व अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेकडे पाहिले जाते. या योजनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे. आतापर्यंत नियोजन केल्यानुसार कामकाज पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असून याद्या प्रसिद्धीचे नियोजन करण्यात आले आहे. याद्या प्रसिद्धीनंतर थेट शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदुकवाल्यांचा अड्डा?

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत हा लाभ शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार युद्धपातळीवर सहकार विभागाने काम सुरू ठेवले आहे. २० किंवा २१ फेब्रुवारीला प्रायोगिक तत्त्वावर पहिली यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीही काम करावे लागणार आहे. त्यानुसार सहाकार विभागाचे अपर सचिव रमेश शिंगटे यानी तसे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त असलेल्या सुटीच्या दिवशीही कार्यालयीन कामकाज सुरू असल्याचे चित्र होते.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

२४ फेब्रुवारीपर्यंत हा आदेश लागू करण्यात आला असून, तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनीही कार्यालय सोडू नये असे सांगण्यात आले आहे. २५ फेब्रुवारीपासून विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. हे लक्षात घेऊन त्याचेही नियोजन करण्याचे आदेशात म्हटले आहे. सद्य:स्थितीला पहिल्या याद्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील काही गावे प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेले आहेत. त्या गावातील नावांची यादी पहिल्यांदा जाहीर केली जाणार आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन गावांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व भूम तालुक्यातील पाथरूड या दोन गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. शिवाय अधिवेशनाच्या काळात विरोधक या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. 

राज्यातील सहकार विभागाची क्षेत्रीय कार्यालये सुटीच्या दिवशी सुरूच राहणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत हा आदेश असून कोणत्याही दिवशी पहिली यादी जाहीर होणार असल्याने त्याच्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी ही कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून मिळाल्या आहेत. 
- विश्वास देशमुख, जिल्हा उपनिबंधक