
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हा प्रशासनाकडील 26.5 एकर जमीन तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
उस्मानाबाद : शहरात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय झाला आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्हा प्रशासनाकडील 26.5 एकर जमीन तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
या पत्रामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचा पहिला ठराव 21 ऑक्टोबर 2011 रोजी तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पारीत करण्यात आला होता.
शिवसेनेच्या आमदाराला आली मंत्रालयात चक्कर
नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या दृष्टिकोणातून प्राथमिक तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली होती. या समितीने 16 सप्टेंबर 2019 रोजी तपासणी अहवाल संचालनालयाकडे सादर केला आहे. सदर अहवाल संचालनालयाच्या 21 सप्टेंबर 2019 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
या तपासणी अहवालामध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात असलेली 26.5 एकर जागा उपलब्ध असल्याचे सांगितले होते. शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही जागा पुरेशी असून, ही जागा जिल्हा प्रशासन वैद्यकीय महाविद्यालयाकरिता देण्यास तयार देखील होते.
ठाकरे सरकारने दिली गुड न्यूज - वाचा
उस्मानाबाद येथे दीडशे विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याकरिता प्रशासनाकडील ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती आता संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया देखील सुरू होऊन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेली 26.5 एकर जमीन आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी मी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन ही जागा हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची 11 फेब्रुवारी रोजी भेट घेत तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती. श्री. लहाने यांनी त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जमीन ताब्यात देण्याविषयी पत्र दिले आहे.
- कैलास घाडगे पाटील, आमदार