लातूरच्या राजकारणात नेहमीच निलंगेकर गटाचा दबदबा

विकास गाढवे
Wednesday, 5 August 2020

विलासराव देशमुख केंद्रीयमंत्री असताना बंडखोरी करून जिल्हा परिषदेत आणली होती सत्ता

लातूर : जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच निलंगेकर गटाचा दबदबा राहिला आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळेच हा दबदबा कायम होता. यामुळेच काँग्रेसला पक्षीय राजकारण व सत्ताकारणात निलंगेकर गटाची नेहमीच दखल घ्यावी लागत होती.

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

विलासराव देशमुख केंद्रीयमंत्री असताना निलंगेकर गटाच्या सदस्यांनी बंडखोरी करून जिल्हा परिषदेत सत्ता मिळवून देशमुख गटाला धक्का दिला होता. डॉ. निलंगेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाच्या राजकारणाला बुधवारी (ता. पाच) उजाळा मिळाला आणि सक्रीय गटाच्या आठवणी ताज्या झाल्या.

 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्याने तत्कालीन सहकारमंत्री केशवराव सोनवणे, माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या रूपाने दिग्गज नेते महाराष्ट्र व देशाला दिले. यात डॉ. निलंगेकर यांचा पक्षीय राजकारणावर सुरवातीपासूनच पगडा होता. यामुळेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासह राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहचले. निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात त्यांचे कार्यकर्ते वाढत गेले आणि विविध नेत्यांच्या गटासोबत लातूरच्या निलंगेकर गटाची ताकद वाढली. निलंगा विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता कायम राहिली.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. यामुळेच जिल्हा बँकेसह अन्य महत्वाच्या सहकारी संस्थांमध्ये सत्तेचा वाटा त्यांना द्यावा लागत होता. देशमुख गटाला त्यांना कधीही दुर्लक्षून चालत नव्हते. यामुळे निलंगेकरांच्या कार्यकर्त्यांना विविध पदे भुषवता आली. राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर विलासराव देशमुख यांची केंद्रात केंद्रीय अवजड उद्योगमंत्रीपदी वर्णी लागली. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

त्यानंतर डिसेंबर २००९ मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका लागल्या. त्या वेळी जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. या निवडणुकीत निलंगेकर गटाने बंडखोरी करत देशमुख गटाच्या उमेदवारांचा पराभव केला. भाजप शिवसेनेने या बंडाळीला साथ दिली होती. यामुळे पंडीतराव धुमाळ यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी संभाजी पाटील यांची निवड झाली होती. या बंडखोरीची राज्यभर चर्चा झाली. यातूनच निलंगेकर गटाचा दबदबा जिल्ह्याच्या राजकारणा पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. या घटनेसह निलंगेकर गटाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात घडलेल्या आठवणी बुधवारी डॉ. निलंगेकर यांच्या निधनानंतर चर्चेत आल्या.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

संघर्षातून अस्तित्व कायम
जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच लातूर विरूद्ध निलंगा असे सत्तासंघर्ष राहिला. सुरवातीला केशवराव सोनवणे गटाशी तर त्यानंतर चाकूरकर गटाशी निलंगेकर गटाचा सुप्त संघर्ष झाला. देशमुख गटांसोबत असलेल्या सुप्त संघर्षाची ठिणगी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत उडाली होती. विरोधकांशी लढा देताना निलंगेकरांना पक्षातील तसेच स्वकीयांसोबतच मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षातून त्यांनी स्वतःचे तसेच निलंगेकर गटाचे अस्तित्व कायम ठेवले असून ते आजही कायम आहे.        

Edit By Pratap Awachar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilangekar group always top in Latur politics