esakal | एकाच घरातील ९ जणांना कोरोना; इच्छाशक्तीच्या बळावर सर्वजण कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

corona recovered family

एकाच घरातील ९ जणांना कोरोना; इच्छाशक्तीच्या बळावर सर्वजण कोरोनामुक्त

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (लातूर): औसा तालुक्यातील माळकोंडजी या गावाच्या माजी सरपंच संजय कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाने कोरोना निर्मूलनाचा एक वेगळा नमुना जगासमोर आणला आहे. पंचवीस व्यक्तींच्या कुटुंबात नऊ लोकांना कोरोनाने घेरले असतांनाही त्यांनी धीर सोडला नाही. शेतात विलगिकरणात जात या कुटुंबाने कोरोनाला हरविल्याने कोरोना झाल्यावर हातपाय गाळून बसणाऱ्यासाठी कुलकर्णी कुटुंब आदर्श बनले आहे.

औसा तालुक्यातील माळकोंडजी या गावाचे माजी सरपंच संजय कुलकर्णी यांचे कुटुंब खूप मोठे आहे. घरात पंचवीस लोक राहतात. वडील सत्तर तर आई पासष्ट वर्षाच्या आहेत. प्रथम संजय कुलकर्णी यांच्या मोठ्या वहिनींना कोरोना झाला. त्यांच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याची लागण घरात झाल्याने घरातील सर्व मंडळींची कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह निघाल्याने आता पुढे काय करावे हे कोणालाच समजत नव्हते. संजय कुलकर्णी यांनी सर्वांना धीर दिला आणि दवाखान्याची पायरी न चढता कोरोनाला हरविण्याच्या चंग बांधला.

हेही वाचा: लातुरात पुन्हा ‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार, पाच जणांना अटक

शेतात असलेल्या मोठ्या शेडमध्ये खाण्यापिण्याची सोय करून हे नऊ जण शेतात गेले. नियमित व्यायाम, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या याचे नियमित सेवन, आणि निसर्गाचे सानिध्य यामुळे दहा दिवसांत सर्वांनी कोरोनवर मात केली. एकाच घरातील नऊ जण संक्रमित होऊनही वयोवृद्ध वडील आणि मधुमेहाचा आजार असणारी वृद्ध आईला कोरोनाने शिवले देखील नाही.

हेही वाचा: कॉल गर्ल म्हणत महिलेचा फोटो आणि मोबाईल नंबर केला व्हायरल; गुन्हा दाखल

लसीमुळे आम्ही सुरक्षित-

यावेळी संजय कुलकर्णी 'सकाळ'शी बोलतांना म्हणाले की, त्यांच्या कुटुंबातील ४५ वयाच्या पुढच्या सर्व व्यक्तींनी लस घेतली असल्याने घरातील वयोवृद्ध आणि इतर लोकांना कोरोनाचा धोका कमी झाला. बुद्धिजीवी लोकांनी लसीकरणाचा प्रचार आणि प्रसार योग्य पद्धतीने केला आणि सर्वांनी लस घेतली तर नक्कीच आपले प्राण वाचू शकतात. लसीच्या बाबतीत अपप्रचार ऐकल्यावर मन सुन्न होतंय. यांना कसं सांगू की या लसीमुळेच माझा भाऊ दिवस रात्र पॉझिटिव्ह वहिनी जवळ असतांनाही त्याला बाधा झाली नाही.