esakal | BreakingNews:घाबरू नका... मराठवाड्याला चक्रीवादळाचा धोका नाही, मात्र या तीन जिल्ह्याला...
sakal

बोलून बातमी शोधा

Natural Cyclone.

अलिबाग, मुंबई, पालघर, दापोली भागांत निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले असले तरी मराठवाड्यात या चक्रीवादळाचा धोका नाही. या निसर्ग चक्रीवादळाचे उगमस्थान अरबी समुद्र होते. हे वादळ रत्नागिरी, अलिबाग, पालघरवरून दक्षिण गुजरातकडे, नवसारी भागाकडे गेले. तिथून खानदेशमार्गे मध्यप्रदेशकडे गेले.

BreakingNews:घाबरू नका... मराठवाड्याला चक्रीवादळाचा धोका नाही, मात्र या तीन जिल्ह्याला...

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: अलिबाग, मुंबई, पालघर, दापोली भागांत निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले असले तरी मराठवाड्यात या चक्रीवादळाचा धोका नाही. या निसर्ग चक्रीवादळाचे उगमस्थान अरबी समुद्र होते. हे वादळ रत्नागिरी, अलिबाग, पालघरवरून दक्षिण गुजरातकडे, नवसारी भागाकडे गेले. तिथून खानदेशमार्गे मध्यप्रदेशकडे गेले.

हेही वाचा- पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हीच ठरवणार आहात ताईच्या चेहऱ्यावरचं हसू, अन डोळ्यातलं अश्रू

वादळाचा वेग १०० ते १२० किलोमीटर प्रतितास सांगितला गेला होता, तो अलिबागदरम्यान होताही; मात्र जसे हे वादळ मुंबईच्या आसपास आले तेव्हापासून वेग कमी झाला, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी ‘सकाळ’ला दिली. 

मराठवाड्यात बुधवारी (ता.दोन) आठही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज होताच. बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडला; तसेच मराठवाड्यात तीन जूनला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागात सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

क्लिक करा- जालना जिल्ह्यात पावसाची रिपरिप : पहा video

मराठवाड्यात वारे वाहणार 
डॉ. डाखोरे यांच्या मते, औरंगाबादेत तीन ते सात जूनदरम्यान पूर्व ते पश्‍चिम या दिशेने १६ ते ३३ किलोमीटर प्रतितास वाऱ्याची गती असण्याची शक्यता आहे. याच कालावधीत बीड जिल्ह्यात १६ ते ३४ या वेगाने दक्षिण ते पश्‍चिम या दिशेने तसेच हिंगोलीत १२ ते ३१ किलोमीटर प्रतितास या वेगाने पूर्व ते पश्‍चिम या दिशेने तसेच जालना जिल्ह्यात १४ ते ३५ किलोमीटर प्रति तास पूर्व ते पश्‍चिम या दिशेने वारे वाहील.

लातूरला १६ ते ३२ प्रतितास या वेगाने दक्षिण ते पश्‍चिम या दिशेने वारे वाहतील. सोबतच नांदेड जिल्ह्यात १० ते २५ किलोमीटर प्रतितास या वेगाने आग्नेय ते पश्‍चिम, उस्मानाबाद जिल्ह्यात १५ ते ३१ किलोमीटर प्रतितास दक्षिण ते पश्‍चिम या दिशेने, परभणी १४ ते ३१ किलोमीटर प्रतितास आग्नेय ते पश्‍चिम या दिशेने वारे वाहणार आहेत. 

येत्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग पाहता उघड्यावर, झाडाखाली जनावरे बांधू नयेत, गोठ्यात बांधावीत. विजेचे खांब पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सतर्कता बाळगावी. 
-डॉ. कैलास डाखोरे, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी विद्यापीठ. 

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम  

loading image