भंडाऱ्यातील अग्निकांडानंतरही लातूरामधील रुग्णालये झोपलेलेच; आग नियंत्रणाच्या सुविधाच नाहीत, रुग्णांचा जीव धोक्यात

हरी तुगावकर
Wednesday, 13 January 2021

लातूर तर हॉस्पिटल हब बनत आहे. येथील खासगी आयसीयूही किती सुरक्षित आहेत हा खरा प्रश्न आहे.

लातूर : भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आगीमुळे दहा चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर रुग्णालयांचे फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला आहे. शासकीय रुग्णालयात अग्निशमनासाठीच्या सुविधांचे तर तीन तेराच आहेत. पण, खासगी रुग्णालयेदेखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी महापालिका सारखी यंत्रणा त्यावर पांघरून घालत आहे.

लातूर तर हॉस्पिटल हब बनत आहे. येथील खासगी आयसीयूही किती सुरक्षित आहेत हा खरा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणाच नाही. त्यामुळे आयसीयूमधील रुग्णांची सुरक्षा देखील एका प्रकारे धोक्यातच आहे. महापालिका मात्र डॉक्टरांकडून ‘अंडरटेकिंग’ घेऊन रुग्ण सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात महापालिकेकडे नोंदणी असलेले १९३ रुग्णालये आहेत. बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार दर तीन वर्षांनी महापालिकेकडे रुग्णालयाचे नूतनीकरण करणे गरजेचे असते. यावेळी महापालिकेने संबंधित रुग्णालयात अग्निशमनच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का? याची पाहणी करणे गरजेचे असते. पण, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एक अंडरटेकिंग देऊन नूतनीकरणाचे सोपस्कार पार पाडले जात आहेत.

नियमांना केराची टोपली
शहरात वीस पेक्षा जास्त ‘आयसीयू’ आहेत. अति गंभीर रुग्णावर येथे उपचार केले जातात. आयसीयूचे वेगळे नियम आहेत. दोन खाटामध्ये किती अंतर असावे ते आतमध्ये कोणाला प्रवेश द्यावा इथपर्यंत हे नियम आहेत. पण, त्यालाही केराची टोपली दाखवली जात आहे. मात्र, किमान आयसीयूमध्ये अग्निशमन सुविधा असणे गरजेचे आहे. पण काही ठिकाणी त्याही नसल्याने येथे उपचार घेणारे रुग्ण सुरक्षित आहेत का? हा खरा प्रश्न आहे. काही ठिकाणी सुविधा आहेत पण प्रशिक्षित कर्मचारी नाहीत अशी अवस्था आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

एक पेक्षा जास्त मजली इमारत असलेल्या प्रत्येक रुग्णालयाला परिपूर्ण अग्निशमन यंत्रणा असली पाहिजे. भंडारा येथील घटनेनंतर सर्वच रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या निघालेल्या त्रुटीची तातडीने पूर्तता करणे संबंधितावर बंधनकारक राहणार आहे. आयसीयूच्या ठिकाणी अशी यंत्रणा अत्यंत गरजेची आहे. अनेक ठिकाणी सुधारणेला वाव आहे.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक

 

रुग्णालयात अशा हव्यात अग्निशमन सुविधा

--होज रिल होज ड्रम एक नग प्रति माळा, तीस मीटर लांब आणि पाच एमएम या आकाराचे नॉझलसह व्यवस्था.
--फायर प्रूफ दरवाजे, पार्टीशनची व्यवस्था
--महत्त्वाच्या ठिकाणी स्मोक डिटेक्टर बसवणे
--आर्द्र उन्मार्ग सुविधा असणे
--इमारत परिसरात यार्ड नळखांबची व्यवस्था
--स्वयंचलित तुषार यंत्रणांची व्यवस्था
--हस्तचलित इलेक्ट्रिक भयसूचना यंत्रणा
--स्वयंचलित तपास व भयसूचना यंत्रणा
--७५ हजार लिटर क्षमतेची पंपिंग हाऊससह भूमिगत पाण्याची टाकी
--गच्चीवर पाणी फेकणाऱ्या फायर पंपसह दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी
--आपत्कालीन बाबतचे आवश्यक ते सर्व निर्देश बोर्ड आवश्यक त्या ठिकाणी लावणे
--पी.ए. सिस्टीमची सुविधा, डोम शेफड फायर बकेट स्टॅण्डसह दर्शनी भागात ठेवणे, फायर बिटर्सची व्यवस्था करणे
--तीन बाय दोन आकाराचा पांढरा बोर्ड, त्यावर लाल अक्षरात अग्निशमन, पोलिस, रुग्णवाहिकेचे फोन नंबर लिहिणे

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Fire Safety In Hospitals Latur Latest News