जालन्यात खरेदीविनाच साजरी झाली अक्षयतृतीया 

महेश गायकवाड
Sunday, 26 April 2020

साडेतीनपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे खरेदीविनाच हा सण साजरा झाला. नेहमी गजबज असणाऱ्या शहरातील सराफा मार्केटमध्ये लॉकडाउनमुळे रविवारी (ता.२६) शुकशुकाट होता.

जालना - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महिनाभरापासून सोने-चांदीची दुकाने बंद आहेत. या काळात गुढीपाडवा आणि त्यानंतर आलेल्या अक्षयतृतीयेसारखे महत्त्वाचे सण सोने-चांदी खरेदीविना साजरे झाले. सराफा मार्केटसह वाहन बाजाराला कोट्यवधीचा फटका बसला आहे. 

साडेतीनपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे खरेदीविनाच हा सण साजरा झाला. नेहमी गजबज असणाऱ्या शहरातील सराफा मार्केटमध्ये लॉकडाउनमुळे रविवारी (ता.२६) शुकशुकाट होता.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

लॉकडाउनच्या काळात जालना शहरातील सराफा व्यापाऱ्यांचे सुमारे चाळीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शासनाचा महसूलही बुडाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गतवर्षी ३१ हजार नऊशे रुपये तोळा असलेले सोन्याचे दर ४७ हजार रुपये तोळा होते. तर ३८ हजार सातशे रुपये किलो असलेले चांदीचे दर ८२ हजारांच्या पुढे होते.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

गतवर्षी दुष्काळामुळे नागरिकांनी कमी प्रमाणात का होईना, सोन्या-चांदीची खरेदी केली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे कुणीही खरेदी केली नाही. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांची उलाढाल शंभर टक्के ठप्प झाली आहे. 

कारागिरांच्या रोजगारावर कुऱ्हाड 

सोने-चांदी मार्केटबरोबर या व्यवसायावर अवलंबून असलेल्याले कारागीर या काळात बेरोजगार झाले आहेत. लॉकडाउनमुळे रोजची रोजीरोटी बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात सोने-चांदी व्यापारावर रोजगार अवलंबून असणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सराफा मार्केटची उलाढाल ठप्प झाली आहे. ज्या महत्त्वाच्या सणाला सोने-चांदी खरदी केली जाते, ते सण या काळात येऊन गेले. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांबरोबरच सोने-चांदी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कारागिरांचा रोजगार गेला आहे. शासनस्‍तरावर त्यांच्या मदतीचा विचार व्हायला व्हावा. 
- भरत गादिया, 
संचालक, भरत ज्वेलर्स 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No shopping in Akshaytrutiya