esakal | लातूर महापालिका क्षेत्रासह उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी

बोलून बातमी शोधा

Latur Latest News}

पाच शहरांत रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यातून वैद्यकीय सेवा, मेडिकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवांना सूट आहे.

लातूर महापालिका क्षेत्रासह उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी
sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात गेल्या शनिवार, रविवारी लागू केलेल्या जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादानंतर मंगळवारपासून (ता.दोन) रात्रीची संचारबंदी (नाइट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. लातूर महानगरपालिका क्षेत्रासह उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर नगरपालिका हद्दीत ती लागू असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पृथ्वीराज म्हणाले, पाच शहरांत रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यातून वैद्यकीय सेवा, मेडिकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवांना सूट आहे. या उपाययोजनेतून मोठा फरक पडणार नसला तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांच्या संवेदना जागृत करण्याचा प्रयत्न आहे.

वाचा -  साहेब जगायचे कसे रडत की हसत? किराणामालाच्या यादीला महागाईचा फटका

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रसाराची माहिती दिली. आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला नसल्याचे स्पष्ट केले. तुलनेत लातूरमध्ये कोरोनाचा मोठा प्रसार नसला तरी अन्य जिल्ह्यांचा बोध घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाची व्याप्ती वाढणार
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कोविशिल्ड लसीकरणाची माहिती दिली. बारा हजार ५०८ आरोग्य कर्मचारी, चार हजार ८२९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तीन हजार ९८८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. सोमवारपासून (ता. एक) ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात अडीच लाख ज्येष्ठ नागरिक, दीड लाख दुर्धर आजाराचे रुग्ण असण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयांतही लसीकरणाचे केंद्र सुरू होणार असून काही सुरू झाली आहेत. या केंद्रांवर दररोज दोनशे जणांना लस देण्याचे नियोजन सुरू आहे. ऑनलाइनसह केंद्रावर नोंदणी केलेल्यांनाही लस देण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरची समस्या दूर झाल्यास केंद्रांच्या संख्येसोबत लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे डॉ. हरिदास यांनी सांगितले.


नियम न पाळल्यास क्लासेसवर कारवाई
कोचिंग क्लासेस बंद करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. मर्यादित विद्यार्थीसंख्या, कोरोनाच्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ते सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास क्लासेसविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांतील लसीकरणावर करडी नजर ठेवण्यात येईल. यंदा सिद्धेश्वर यात्रा होणार नसली तरी यात्रेतील विधी व परंपरांचे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संपादन - गणेश पिटेकर