लातूर जिल्ह्यासाठी ऑक्टोबर ठरला दिलासादायक, तीन हजार २२ जणांना कोरोनाची लागण

3Corona_102
3Corona_102

लातूर : जिल्ह्यासाठी सप्टेंबरपेक्षा ऑक्टोबर दिलासादायक ठरला आहे. या महिन्यात तीन हजार २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या महिन्यातील वीस दिवस, तर दोन आकड्यांच्या संख्येतच रुग्णांची संख्या राहिली. हळूहळू जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण अद्याप संकट टळलेले नाही. त्यामुळे या पुढील काळातही नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाची लागण होण्यास सुरवात झाली.

या महिन्यात केवळ १६ रुग्ण आढळून आले. पुढे हा आकडा सातत्याने वाढत गेला. मेमध्ये ११९ जणांना लागण झाली. जूनमध्ये २१४ तर जुलैमध्ये एक हजार ८५१ जण बाधित झाले. ऑगस्टमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. सप्टेंबर तर लातूर जिल्ह्यासाठी धोकादायक ठरला. सरासरी रोज तीनशे ते चारशे जणांना कोरोनाची लागण होत गेली. त्यामुळे या महिन्याचा बाधितांचा आकडा नऊ हजार १८८ वर गेला. रोज रुग्ण मोठ्या संख्येने समोर येत होते. ऑक्टोबर तर आणखी धोकादायक जाईल असे वाटत होते.

पण, या महिन्यात मात्र रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसली. महिन्याचे सुरवातीचे सात आठ दिवसच तीन अंकी संख्येत रुग्णसमोर आले. त्यानंतर मात्र शंभराच्या आतमध्येच रुग्णांची संख्या राहिली. त्यात सर्वांत कमी ता. ३१ आक्टोबर रोजी केवळ २९ जणांनाच कोरोनाची लागण झाली. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील अकरा कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला. रुग्ण कमी होत असल्याने शासकीय रुग्णालयावरील ताणही कमी होण्यास मदत मिळाली आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत वीस हजार ३२१ जणांना बाधा झाली. त्यापैकी १९ हजार ४० जणांनी कोरोनावर मात केली. ६११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६७० जणांवर उपचार सुरू आहेत. ऑक्टोबरने लातूरकरांना दिलासा दिला. पण, कोरोनाचे संकट टळलेले नाही. दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे तसेच वारंवार हात धुणे अशा उपाय योजनांची काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

रुग्णांचे आकडे बोलतात
एप्रिल--१६
मे--११९
जून--२१४
जुलै--१८५१
ऑगस्ट--५९११
सप्टेंबर--९१८८
ऑक्टोबर--३०२२

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com