वयोवृद्ध जन्मदात्यांवर लेकाचे कुऱ्हाडीने वार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

रात्रीचे जेवण झाल्यावर उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई ठार झाल्या, तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले.

बदनापूर (जि. जालना), ता. 3 : गोकुळवाडी तांडा (ता. बदनापूर) येथे वयोवृद्ध जन्मदात्यांवर लेकाने कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात आई जागेवरच ठार झाली, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही मनाला चटका लावणारी घटना गुरुवारी (ता. दोन) रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या डोक्‍यावर परिणाम झाल्याने त्या भरात त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा : जालना झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी

याबाबत ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, गोकुळवाडी तांडा येथे मोलमजुरी करणारे उत्तम घुमाजी चव्हाण (वय 70) व ठकूबाई उत्तम चव्हाण (वय 60) असे वयोवृद्ध दांपत्य वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले असून, एक मुलगा त्याच्या सासुरवाडीला राहतो, तर दुसरा शेजारीच राहतो. मात्र तो सध्या ऊसतोडीच्या कामाला बाहेरगावी गेला आहे. त्यांचा तिसरा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण (वय 36) हा काहीसा मनोरुग्ण असून त्याच्या पत्नीने त्याला सोडले आहे.

हेही वाचा :   नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का? 

दरम्यान, गुरुवारी (ता. दोन) रात्रीचे जेवण झाल्यावर उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई ठार झाल्या, तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत नातीने ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर उपसरपंच कल्याण पवार, राजू राठोड, सुभाष चव्हाण, बाळू चव्हाण यांनी तत्काळ बदनापूर पोलिसांना संपर्क साधला.

हेही वाचा :  नवं वर्ष उमेदीचं...​

पोलिस मुख्य जमादार नितीन ढिलपे, किशोर पुंगळे, श्री. बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात आई-वडिलांवर वार करून त्याच ठिकाणी बसलेल्या दिलीपला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच उत्तम चव्हाण व ठकूबाई चव्हाण यांना बदनापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीही न करता दोघांना जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर ठकूबाई मृत असल्याचे जाहीर केले. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भिमाळे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old woman murdered by son in Badnapur taluka