esakal | अतिवृष्टीने एकट्या लातूर जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्राला बाधा 
sakal

बोलून बातमी शोधा

shetkari.jpg

भरपाईसाठी ७६ कोटी निधीची मागणी; भरपाईसाठी १७५ कोटींची गरज 

अतिवृष्टीने एकट्या लातूर जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्राला बाधा 

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक लाख आठ हजार हेक्टरवरील पिकांना बाधा पोचली असून, पिकांसह जमीन खरडून जाण्यासह घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. नुकसानीच्या पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाने भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७६ कोटी ८८ लाख रुपये निधीची मागणी सरकारकडे केली आहे. महिन्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रशासनाने ९४ कोटी १९ लाखाच्या निधीची मागणी केली होती. यामुळे दोन महिन्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी १७४ कोटी ९७ लाख रुपये निधी लागणार आहे. या निधी मंजुरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले होते. पंचनामे सुरू असतानाच अनेक मंत्र्यांनी त्याची पाहणी केली होती. यातच जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यानुसार ऑक्टोबरमधील परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक लाख आठ हजार ५१४ हेक्टरवरील पिकांना बाधा पोचली असून सर्वाधिक ४२ हजार २७२ हेक्टर नुकसान औसा तालुक्यात तर ३९ हजार २९५ हेक्टर निलंगा तालुक्यात झाले आहे. लातूर तालुक्यातील ४२६ हेक्टरवरील, शिरूर अनंतपाळ-चार हजार ५४१, देवणी-एक हजार ३१८ तर जळकोट तालुक्यातील पाच हजार ८०१ हेक्टरवरील पिकांना बाधा पोचली आहे. जमीन खरडून औसा तालुक्यात १६५ हेक्टर, निलंगा तालुक्यात ८३० हेक्टर व उदगीर तालुक्यात १.७० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात २८५ घरांची पडझड झाली असून, यात निलंगा तालुक्यातील १३५, लातूर - सहा, औसा-१०५, शिरूर अनंतपाळ-१५, देवणी-चार, उदगीर-१२ तर अहमदपूर तालुक्यातील आठ घरांचा समावेश आहे. प्रशासनाने पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ७६ कोटी ८८ लाख ६५ हजार, जमीन खरडून झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तीन कोटी ७३ लाख ७६ हजार तर घरांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी १४ लाख १६ हजार रुपये निधीची मागणी सरकारकडे केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 पावणेदोनशे कोटींची गरज 
परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात थैमान घातले. सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाने यापू्र्वीच निधीची मागणी केली होती. यात सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात एक लाख ३७ हजार ९७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पाच हेक्टर जमीन खरडून गेली होती. यात पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ९४ कोटी १९ लाख वीस हजार तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी एक लाख ९४ हजार रुपये निधीची मागणी केली होती. दोन्ही महिन्यांत झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी १७४ कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये निधीची मागणी सरकारकडे केल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. निधी मंजूर होताच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, निधी मंजुरीची सर्वांना प्रतीक्षा आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)