अंबाजोगाईत एक हजार कोरोना वॉरियर्सची फौज 

Beed News
Beed News

अंबाजोगाई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध घटकांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अद्याप तरी कोरोना जिल्ह्याच्या वेशीबाहेरच आहे. जरी, उद्या काही वेळ आली तरी आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे. एकट्या अंबाजोगाईत एक हजार कोरोना वॉरियर्सची फौज तैनात असेल, असे नियोजन आहे. 

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय असल्याने आधुनिक सुविधा तर आहेतच. शिवाय वैद्यकीय महाविद्यालय असल्याने प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी अशी डॉक्टरांचीच संख्या साडेचारशे एवढी आहे. उर्वरित कर्मचारी तर वेगळेच. सध्या २०० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड यंत्रसामग्रीसह तयार आहे. आतापर्यंत येथील विलगीकरण कक्षातून ३४ लोकांचे स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी झाली. सर्वाधिक स्थलांतरित असले, तरी त्यांची चेकपोस्टवर स्क्रीनिंग, गावात आल्यानंतर आशा व अंगणवाडी सेविकांकडून आरोग्याची माहिती घेण्यात आली. त्यामुळे त्यांचे प्राथमिक आजार आणि त्यांच्या प्रवासाची माहिती प्रशासनाच्या हाती आली.

ग्रामविकास आणि आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्व्हे केला. त्यातूनही कोणाला तशी काही लक्षणे आहेत का, याची माहिती घेऊन त्यांचे होम क्वारंटाइन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन; तसेच गरज वाटलेल्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. मात्र, जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्शवत पॅटर्न निर्माण केल्याने कोरोनाला जिल्ह्याची वेस पार करता आलेली नाही.

लॉकडाउन, संचारबंदीची अंमलबजावणी व पालन देखील उत्तम होत आहे; पण भविष्यात काही गरज पडली तर आरोग्य विभागाची तयारी काय, याचा ‘सकाळङ्कने आढावा घेतला. त्यामुळे गरज पडली तर एकट्या अंबाजोगाईतच एक हजार कोरोना वॉरियर्स सज्ज असून, अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध असल्याचे दिसले. 

मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर व अंबाजोगाई या तीनच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. बीडमध्ये एक हेही बीडकरांचे नशीबच आहे. येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व वैद्यकीय तज्ज्ञांसह यंत्रणा कार्यरत असल्याने अगोदरच याची तयारीही करण्यात आली होती. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, या रुग्णालयस्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन विविध समित्या स्थापन केल्या. कोरोनाचा सामना करण्यासाठी व येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०० बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार केला. 

वॉर्डचे नियोजन 

आयसोलेशन वॉर्डमध्ये अतिगंभीर रुग्णांसाठी ३ बेड, मध्यम अत्यवस्थ रुग्णांसाठी ७ बेड व संशयित रुग्णांना ११० बेड अशी तयारी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या कक्षात २६ रुग्णांची तपासणी झाली. त्यात काही जणांचे दोनदा असे ३२ नमुने (स्वॅब) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. ते सर्व स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत. 

या वॉर्डमध्ये ३ व्हेंटिलेटरसह, मॉनिटर, नेब्युलायझर, एन- ९५ मास्क, पीपीई किट यासह औषधी उपलब्ध करण्यात आली आहेत. सध्या या वॉर्डमध्ये गरजेनुसार प्राध्यापक, २ सहायक प्राध्यापक, अधिव्याख्याता, परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. विशेषतः मेडिसीन विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांना याची जबाबदारी सांभाळावी लागते. 

अशी आहे कोरोना वॉरियर्सची फौज 

संभाव्य काळात रुग्ण वाढले तरी त्यांच्यावरील उपचार व सेवेसाठी डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी सज्ज होऊ शकतात. त्यात वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी असे १५० डॉक्टर, ३०० निवासी डॉक्टर, २५० परिचारिका, ३०० चतुर्थश्रेणी कर्मचारी हे कार्यरत ठेवण्याची तयारी येथील प्रशासनाने केली आहे. 

संस्था आल्या मदतीला 

कोरोनाचा सामना करण्यासाठी मानवलोक संस्थेने दोन लाख रुपये खर्चाची ऑॅक्सिजन सेंट्रल पाइपलाइन करून दिली, त्याचबरोबर १००० एन ९५ मास्क, १५ पीपीई किट दिल्या. केज पंचायत समितीने ८० हजारांचे नेब्युलायझर यंत्र दिले. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनतर्फे २ लाख ५० हजार रुपये खर्चाची विविध यंत्रसामग्री मिळणार आहे. आमदार नमिता मुंदडा व कृषी उत्पन्न बाजार समितीने १०० लिटर सॅनिटायझर व रुग्णांच्या नातेवाइकांच्या भोजनासाठी २ लाख ५० हजार रुपये खर्चाचे किराणा साहित्य दिले आहे. 

शासनाची मदत 

वॉर्ड दुरुस्तीसाठी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला एक कोटी ७० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय शासन व जिल्हा नियोजन मंडळाकडून साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार हेही विशेष लक्ष ठेवून विचारपूस करतात. 

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व तयारी आहे. डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असले, तरी ते रुग्णांसाठी या सेवेत तळमळीने कार्यरत आहेत. 
- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com