हमीभाव नोंदणीचे तुणतुणे !

दत्ता देशमुख   
Sunday, 4 October 2020

बीड जिल्ह्यातील चित्र : कमी भावात मालाची विक्री 

बीड : कधी जादा पावसाने पिके हातची जातात तर कधी पावसाअभावी. यंदा तर कहर म्हणजे बियाणेच वांझोटे निघाले. त्यातून शेतकऱ्यांच्या जे काही हाती लागले त्याच्या विकायचीही हमी नाही. एव्हाना जे काही पिकले ते व्यापाऱ्यांच्याच पदरात कवडीमोल दराने जावे, याची एक साखळीच सरकारी यंत्रणेत असल्याचे नवे नाही. यंदाही गरजू शेतकरी उडीद व मुगाची कवडीमोल दराने विक्री करत असताना मार्केटिंग फेडरेशन आता कुठे हमीभावासाठी ऑनलाइन नोंदणीचे तुणतुणे वाजवित आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच पावसाळा हंगाम सुरू होताच निसर्गानेही साथ दिली. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही मोठ्या हुरूपाने खरीपाच्या पेरण्या केल्या. कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी झाली. पण, कधी निसर्ग तर कधी यंत्रणा शेतकऱ्यांच्या मुळावर असते तसे यंदा सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाले. हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यात शेतकरी पिचून निघाला. लोकप्रतिनिधींनी यात राजकारण केले. पण, अपवाद वगळता शेतकऱ्यांच्या हाती भरपाईपोटी कवडीही भेटली नाही. त्यात मागच्या महिन्यात सलग जोरदार पावसाने शेतांत पाणी साचले आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात कसेबसे हाती लागलेले मूग, उडीद हे पीक आता शेतकऱ्यांना विकायचे आहे. मात्र, सरकारी यंत्रणा मात्र शेतकऱ्यांच्या नडीवेळी खरेदी करण्याऐवजी ऑनलाइन नोंदणीचे तुणतुणे वाजवित आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
शेतकरी आर्थिक अडचणीत; खरेदी कधी 
सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभावाने उडीद व मुगाच्या खरेदीसाठी १४ केंद्रांना मंजुरी दिली आहे. वडवणी वगळता सर्व तालुक्यांतील संस्थांमार्फत हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. आष्टी व अंबाजोगाईत प्रत्येकी तीन संस्था तर इतर आठ तालुक्यांत प्रत्येकी एक संस्थेमार्फत खरेदीचे नियोजन आहे. मात्र, शेतकरी आर्थिक नडीत असल्याने त्याला आज जवळ माल ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची विकायची वेळ असताना हमीभावाने खरेदीबाबत अद्याप आदेशच नाहीत. विशेष म्हणजे ऑनलाइन नोंदणी सुरू असली तरी शेतकऱ्यांना आज निकड असल्याने भविष्यातील खरेदीसाठी त्याला फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसते. आतापर्यंत मुगासाठी शंभराच्या आसपास शेतकऱ्यांची नोंदणी असून उडदासाठीच्या खरेदीसाठीचा आकडा केवळ दहाच्या घरात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माल कवडीमोल दराने विक्री 
शेतकऱ्यांच्या निकडीवेळी शासन कधीच हमीभावाने खरेदी करत नाही. शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्याच घशात माल घालावा आणि नंतर तोच माल व्यापाऱ्यांकडून हमीभावाने खरेदी व्हावा अशीच यंत्रणा वर्षांनुवर्षे कार्यान्वित आहे. यंदाही तोच प्रकार घडत आहे. हमीभावाने मुगाचा दर ७,१९६ रुपये तर उदडाचा दर सहा हजार रुपये आहे. मात्र, बाजारात यापेक्षा व्यापारी अगदीच कमी भावाने खरेदी करत आहेत. आता ऑनलाइन नोंदणीचे तुणतुणे सरकार वाजवित आहे. पण, गरजवंत शेतकरी नाईलाजाने व्यापाऱ्यांना आपला माल विकत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाच माल विकावा अशीच सरकारी यंत्रणा काम करत असल्याचे स्पष्ट आहे. 
 

हमीभाव खरेदीसाठी जिल्ह्यात १४ केंद्र निश्चित करण्यात आले असून, ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. खरेदीबाबत अद्याप शासनाच्या सूचना नाहीत. 
- एम. डी. कापुरे, जिल्हा पणन अधिकारी. 

शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्याच घशात माल घालावा आणि व्यापाऱ्यांचा माल पुन्हा हमीभावाने खरेदी करायचा अशी यंत्रणा वर्षानुवर्षे कार्यान्वित आहे. 
- कालिदास आपेट, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना. 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online registration for crop guarantee Beed news