सार्वजनिक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांसाठी केवळ ५० लोक उपस्थित राहू शकतात, मर्यादा ओलांडल्यास कारवाई

विकास गाढवे
Thursday, 4 March 2021

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सार्वजनिक व अन्य कार्यक्रमांतील उपस्थितींवरील बंधने हटवण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असताना विविध कार्यक्रमांना लोकांची गर्दी वाढली आहे.

लातूर : जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रसार राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सार्वजनिक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांतील लोकांच्या उपस्थितींवर मर्यादा आणल्या आहेत. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडावे लागणार आहेत. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पृथ्वीराज यांनी दिल्याने येत्या काळात होणाऱ्या लग्न व धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत.

वाचा - राजीनाम्यावरुन मुंडे बहीण-भाऊ पुन्हा समोरासमोर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर राजकारण!

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सार्वजनिक व अन्य कार्यक्रमांतील उपस्थितींवरील बंधने हटवण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असताना विविध कार्यक्रमांना लोकांची गर्दी वाढली आहे. कार्यक्रमांतील गर्दीला आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी बुधवारी (ता. तीन) आपत्ती व्यवस्थापन तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा व अन्य तरतुदीनुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व इतर कार्यक्रमांतील लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या आहेत. यापुढील काळात केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम साजरे करण्याचे बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी घातले आहे.

वाचा - काय सांगता! सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात

सार्वजनिक स्वरुपाचे तसेच धार्मिक कार्यक्रम रूढी व परंपरेनुसार पार पाडण्यास परवानगी देण्यात आली. असे असले तरी केवळ आवश्यक विधीसाठीही ५० लोकांचीच उपस्थिती बंधनकारक केली आहे. कार्यक्रमाला पन्नासपेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियमातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 50 People Allowed In Functions Latur Latest News