लातूरमध्ये चारच रुग्ण व्हेंटीलेटरवर, कोरोनाचा प्रभाव कमी

हरी तुगावकर
Monday, 21 December 2020

काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रभावही कमी होताना दिसत आहे. कोरोनाची लागण झाली तर व्हेंटीलेटर किंवा ऑक्सिजन अनेक रुग्णांना गरज भासत नसल्याचे दिसून येत आहे.

लातूर : काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रभावही कमी होताना दिसत आहे. कोरोनाची लागण झाली तर व्हेंटीलेटर किंवा ऑक्सिजन अनेक रुग्णांना गरज भासत नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. १९) कोरोना रुग्णांच्या संख्येत ४५ ने वाढ झाली. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २२ हजार ६४४ वर गेला आहे. यात ३९७ रुग्णावरच उपचार सुरु आहेत. यापैकी केवळ चारच रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या ३९ इतकी आहे. ही लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

 

जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले. रोज चाळीस पन्नास रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. पण कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव पहिल्या इतका जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) २२३ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यापैकी केवळ १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ३१३ जणांच्या ॲंटीजेन टेस्ट करण्यात आल्या. यापैकी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अशा एकूण ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २२ हजार ६४४ वर गेला आहे. यापैकी ३९७ जणांवर उपचार सुरू आहेत.

यात १५२ रुग्ण तर घरीच उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी २१ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. एक रुग्ण मेकॅनिकल व्हेंटीलेटरवर आहे तर तीन रुग्ण बीआयपीएपी व्हेंटीलेटवर आहे. सध्या केवळ ३९ रुग्णांनाच ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २०३ आहे.

 

बिनधास्तपणा नको, काळजी हवी
गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण, कोरोनाचे संकट टळलेले नाही. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. शारीरिक अंतराच्या तीन तेरा वाजले आहेत. अनेकांनी मास्क वापरणेही बंद केले आहे. तर दुसरीकडे दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बिनधास्तपणे फिरणे टाळण्याची गरज आहे. शासनाने सांगितलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली तर कोरोनापासून दूर राहण्यास मदत होणार आहे.

लातूर कोरोना मीटर
एकूण बाधित ः २२,६४४
उपचार सुरू असलेले ः ३९७
बरे झालेले ः २१,५८०
मृत्यू ः ६६७

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only Four Patients On Ventilators, Corona Infection Decrease In Latur