उपसरपंच म्हणाला, हे मुलं माझे नाहीच! नंतर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

  • पदाच्या अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी नाकारले  अपत्य
  • भावासह ठोठावला पाच लाखांचा दंड 
  • खंडपीठाचा आदेश

औरंगाबाद - अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी स्वत:चे अपत्य आपले नसल्याचे सांगितले. या प्रकरणात पिंपळवाडी पिराची (ता. पैठण) येथील उपसरपंचासह त्याच्या भावाला औरंगाबाद खंडपीठाने गेल्यावर्षी अपात्र ठरविले होते. तसेच दोघांना प्रत्येकी अडीच लाखांप्रमाणे एकूण पाच लाखांचा दंडही ठोठावला होता. दोघांविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेशही दिले होते. पाच जुलै 2018 ला हा आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिले होते; तसेच याविरोधात दोन्ही भावांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता खंडपीठाचा निकाल कायम ठेवण्यात आला होता. दरम्यान, यापैकी एकाने अचल संपत्ती नसल्याचा दावा केला. त्यावर खंडपीठाने चल संपत्तीतून अडीच लाख रुपये वसुलीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

या प्रकरणातील दंड ठोठावलेले मुनाफ शेख यांनी खंडपीठात अडीच लाख रुपये जमा केले. दुसरा भाऊ मिनाज शेख यांनी दंडाचे अडीच लाख रुपये जमा केले नाही. वेळोवेळी खंडपीठाकडून मुदतवाढ मागून घेतली. 16 ऑगस्ट 2019 ला जमीन महसूल अधिनियमान्वये खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना रक्कम वसुलीसाठी कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार पैठण येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी अहवाल दाखल केला.

त्यात मिनाज यांच्याकडे अचल संपत्ती नसल्याचा दावा केला. अहवालाआधारे खंडपीठाने मिनाज यांना अवमान नोटीस बजावली. तसेच त्याच्या चल संपत्तीतून अडीच लाख रुपये वसुलीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. मूळ तक्रारकर्ते आणि याचिकाकर्ते बिलाल इसाक शेख यांच्या वतीने ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. 

हेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड

शिक्षिकेचे तीन लाख रुपये लंपास करणाऱ्यास बेड्या 
औरंगाबाद -
रिक्षात प्रवास करताना निवृत्त शिक्षिकेचे रोख रकमेसह दागिने असा सुमारे दोन लाख 99 हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद खुर्शीद अन्सारी मोहम्मद युसूफ अन्सारी (वय 40, रा. राहिमनगर, किराडपुरा) याला सोमवारी (ता. 18) रात्री अटक केली. प्रकरणात मंगला जोशी-देशपांडे (63, रा. मधुबन शिक्षक सोसायटी, गादियाविहार) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, मंगला जोशी या बाहेरगावाहून 28 सप्टेंबर रोजी रात्री रेल्वेस्थानकावर उतरल्या.

हेही वाचा -  येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..

रिक्षाने देवगिरी महाविद्यालयाच्या रोडने गाडे चौक, दर्गा चौक मार्गे गादिया विहाराकडे गेल्या. याकाळात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी त्यांच्या बॅगमधील सोन्याचे पावणेतीन लाखांचे दागिने आणि 25 हजारांची रोकड लंपास केली. हा प्रकार घरी परतलेल्या मंगला यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी तपास करून तब्बल दीड महिन्यांनी आरोपी मोहम्मद खुर्शीद याला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल व दागिने असा सुमारे दोन लाख 66 हजार 255 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (ता.21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भंडारी यांनी मंगळवारी (ता.19) दिले.
आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of Bombay High Court's Aurangabad Bench