
उस्मानाबाद पालिकेचे कर्मचारीच करतात बाधीताच्या प्रेतावर अंत्यसंस्कार.
आतापर्यंत कोरोनाबाधीत ५० जणांवर केले अंत्यसंस्कार
उस्मानाबाद : `साहेब शासकीय नोकरी इमाने-इतबारे करायची असेल तर पडेल ते काम करण्याची तयारी पाहिजे. अनेकांना नोकरी मिळत नाही. सध्याच्या आणिबाणीच्या काळात पडेल ते काम केल्याचा आनंद आहे. मग, कोरोनाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार हा एक कामाचा भाग आहे`. पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी विलास गोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अनेकजण जवळचे नातेवाईकही प्रेताकडे फिरकत नसल्याची भावना व्यक्त केली.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
गोरे यांच्या टीमने आतापर्यंत कोरोनाबाधीतांच्या ५० देहावर अंत्यसंस्कार केले असून सुरुवातीच्या काळात भितीच्या सावटाखाली होतो. आता मात्र आमची भिती मेली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. विकसीत राष्ट्रासह आपल्या देशातही कोरोनाने अनेकजणांचे बळी घेतले आहेत.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनाबाधींतांचा आकडा तब्बल दिड हजाराच्या पुढे सरकला आहे. दरम्यान कोरोना झालेल्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा देह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. यातून अन्य नागरिकांना लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे असते. असे असले तरी मृत्यूमुखी पडलेल्यांचे जवळचे नातेवाईक अंत्यविधीला दूर अंतरावर थांबूनही हजेरी लावत नसल्याचे गोरे सांगतात. काहीजण तर फोनही उचलत नाहीत. तर काहीजण, सर्व तुम्हीच करा, असे सांगूण फिरकत नाहीत. तत्काळ फोन ठेवून देत असल्याची भावना गोरे यांनी बोलून दाखविली.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
५० देहावर अंत्यसंस्कार
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात तब्बल ५० जण कोरोनाबाधीत होऊन मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या आरोग्य विभागातील टीमकडून अंत्यसंस्कार केले जातात. जिल्हा रुग्णालयाकडून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र येते. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाची टीम कामाला लागते. सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात बाधींतांची संख्याही वाढत आहे.
दीड-दोन महिन्यांपूर्वी आठवड्यातून तीन-चार देहावर अंत्यसंस्कार करावे लागत होते. आता एकाच दिवशी तीन-चार मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे कामाची विभागणी करावी लागते. दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. एका टीमने सकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसरी टीम अन्य अंत्यसंस्कारासाठी जाते.
पालिकेने अंत्यसंस्कार करणाऱ्या टीमला सर्वच साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये त्यांना पीपीई कीट, शूज, हँडग्लोज आदी साहित्य दिले आहे. शिवाय सर्व काम काटेकोरपणे करण्याच्या सुचना आहेत. यातून अन्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यासाठी सर्व काम सतर्क राहून करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अंत्यसंस्कार करणारे सर्वच कर्मचारी चांगले काम करीत आहेत.
-मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद.घरातून बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला घरची मंडळी देतात. सुरुवातीच्या काळात घरातील मंडळींना भिती होती. मात्र आता दररोज तेच काम असल्याने त्यांनाही काही वाटत नाही. मात्र अंत्यसंस्कार झाल्यानंतर आंघोळ करणे. घरी आल्यानंतरही कपडे बदलणे. सॅनिटायझर वापरणे, अशा बाबी केल्याशिवाय घरात प्रवेश करीत नाहीत. अशा पद्धतीने दररोज काळजी घेतो.
- विलास गोरे, कर्मचारी, नगरपालिका, उस्मानाबाद.
Edited By Pratap Awachar