अखेर उस्मानाबादच्या 'सह्याद्री'वर कारवाई, ॲटिजेनद्वारा रुग्णांची लूट प्रकरण ! 

तानाजी जाधवर
Thursday, 24 September 2020

सकाळ बातमीचा परिणाम - उस्मानाबाद येथील सह्याद्री हॉस्पिटलवर अखेर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. ॲटिंजेन टेस्टद्वारे रुग्णांची लुट या प्रकणानंतर सकाळ ने वृत्त प्रकाशित केले होते.  

उस्मानाबाद : शहरातील सह्याद्री हॉस्पीटलवर जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले असुन यापुढे हॉस्पीटलमध्ये अँटिजेन टेस्ट न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८२ जणाकडून अधिक रक्कम घेतल्याची बाब तपासणीत उघड झाली असुन जवळपास एक लाख रुपयाची लुट हॉस्पीटलने नुसत्या टेस्टमधून करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्या सर्व रुग्णांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश असुन येत्या आठ दिवसात ही रक्कम त्याना परत करावे लागणार आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सह्याद्री हॉस्पीटलकडुन अँटिजेन टेस्टच्या माध्यमातुन रुग्णाची लुट केल्याचे वृत्त सकाळ ने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेऊन त्या हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. उपकोषागार अधिकारी शफीक कुरणे व यानी तपासणी अहवाल सादर केल्यानंतर हॉस्पीटलने अशा प्रकारे लुट केल्याचा ठपका त्यामध्ये ठेवण्यात आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अहवालामध्ये हॉस्पीटलने रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या एकुण ८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ७३ जणांना पावत्या दिल्या आहेत. तर नऊ रुग्णांना पावत्या सुद्धा दिल्या नव्हत्या. ७३ पैकी ६६ जणाकडून दोन हजार रुपयानी ही टेस्ट करण्यात आली असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तर पाच रुग्णांना एक हजार ६०० रुपयानी टेस्ट केली होती, दोन रुग्णांना दिड हजार रुपये अशी रक्कम आकारली होती. वास्तविक पाहता ही टेस्ट फक्त सहाशे रुपयांना करण्याचे शासनाचे आदेश आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे अधिकची रक्कम ९९ हजार २०० रुपये इतकी झाली आहे. दरापेक्षा जास्त आकारणी करणे. तसेच काही रुग्णांना रॅपिड अँटिजेन टेस्टची पावती न देणे अशा प्रकारच्या गंभीर स्वरुपाचे कृत्य केले आहे. यामुळे त्यांना अधिकची रक्कम आठ दिवसात रुग्णांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले. तर हॉस्पीटलने दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता हॉस्पीटलमध्ये अँटिजेन टेस्ट न करण्याचेही आदेशात म्हटले आहे.  या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Sahyadri Hospital Action taken by administration