उस्मानाबादेत प्रभारीराज; कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत सेनापती मिळेना ! 

Osamanabad zp office.jpg
Osamanabad zp office.jpg

उस्मानाबाद : जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय या जिल्ह्यातील दोन प्रमुख संस्था आहेत. मात्र या दोन्ही संस्थेवरील प्रमुख पदे रिक्त असल्याने ऐन कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना संसर्गाच्या युद्धजन्य परिस्थितीत सेनापती नसल्याने प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख सैरभर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम करतात. डॉ. संजय कोलते यांची बदली पुणे येथे झाल्यानंतर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी अद्याप मिळालेली नाहीत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेही नव्याने सोलापूर येथून बदली होऊन आलेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत प्रभारीराज सुरू आहे. त्यातच जिल्ह्यातील सुमारे चारशे ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेतील प्रमुख प्रशासक म्हणून बसवण्यात येत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनाही आता गाव पातळीवर विविध विकास कामांसाठी लक्ष द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्यांच्या खालील प्रशासनातील मंडळी सैरभैर झाल्यासारखं परिस्थिती तयार होत आहे.

एकीकडे कोरोनामुळे गाव पातळीवर विविध प्रकारचे उपाय योजना करणे. संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी काही नियमावली करुन त्याची अंमलबजावणी करणे. आदी कामे करावी लागत आहेत. अशा परिस्थितीत ही पदे रिक्त असल्याने विभाग प्रमुखांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयाचीही अशीच स्थिती आहे. जिल्हा शल्यचिकित्सक हे जिल्हा रुग्णालय आणि तालुक्याच्या ठिकाणीची उपजिल्हा रुग्णालये यांचे प्रमुख असतात.

त्यांच्या अधिकारात आरोग्यसेवा राबवली जाते. दरम्यान तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर प्रभारी म्हणून डॉ. धनंजय पाटील यांच्याकडे पदभार आला आहे. त्यांना प्रशासनातील फारसा अनुभव नाही. असले तरी काही दिवस त्यांनीही कामकाज सुरळीतपणे चालविले आहे. मात्र सध्या त्यांनाच संसर्गाला सामोरे जावे लागत असल्यामुळे आता पुन्हा हे पद अन्य दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रभारीराजची ही संगीत खुर्ची कधी थांबणार? जिल्ह्यातील मृत्युदर कधी कमी होणार? याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com