तीन ट्रॅक्टरमधून ५० ऊसतोड मजुरांना पकडले

दिलीप गंभिरे
Sunday, 5 April 2020

सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांची कळंब येथील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेतील तात्पुरत्या निवारागृहात सोय करण्यात आली आहे. 

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोल्हापूरहून परभणी जिल्ह्यातील सोनपेठकडे जाणाऱ्या ५० ऊसतोडणी मजुरांना घेऊन निघालेले तीन ट्रॅक्टर पोलिसांनी रविवारी (ता. पाच) सात्रा फाटा (ता. कळंब) येथे पकडले. सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांची येथील येरमाळा रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेतील तात्पुरत्या निवारागृहात सोय करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांची गैरसोय होत आहे. त्यांना गावाकडे जाण्यासाठी लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊसतोडीसाठी कारखान्यांकडे असलेल्या मजुरांना सोडू नये, त्यांची व्यवस्था कारखाना परिसरातच करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले. तरीही मजुरांचे लोंढे गावाकडे मिळेल त्या वाहनाने निघत आहेत. 

हेही वाचा :  कोल्हापूरहून आलेल्या ऊसतोड मजूरांची तपासणी

सोनपेठ (जि. परभरणी) तालुक्यातील ऊसतोड मजूर कोल्हापूर येथील साखर कारखान्यांकडे ऊसतोडीसाठी गेले होते. हे सर्व मजूर तीन ट्रॅक्टरमधून कळंबमार्गे सोनपेठकडे निघाले होते. लॉकडाऊनमुळे पोलिस प्रशासन प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहे. कळंब तालुक्यातील सात्रा फाटा येथे पोलिसांनी या मजुरांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रविवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास पकडले. त्यानंतर या ट्रॅक्टरमधील सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांची रवानगी जिल्हा परिषद शाळेतील तात्पुरत्या निवारागृहात केली.

तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी तातडीने भेट देऊन त्यांच्या जेवण व राहण्याची सोय करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. लहान मुलांची संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी दूध उपलब्ध करण्याची सूचनाही त्यांनी केली. 

पत्रकार संघाकडून कपडे वाटप 
गेल्या सहा दिवसांपासून या मजुरांचा ट्रॅकटरमधून सोनपेठकडे प्रवास सुरू आहे. त्यांना जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. लहान मुलांची व महिलांची अवस्था पाहून कळंब तालुका पत्रकार संघाने महिला व मुलांसाठी कपडे वाटप केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad 50 laborers were caught in three tractors