साधेपणाने जुळल्या रेशीमगाठी, ५१ हजार दिले मुख्यमंत्री निधीसाठी

दिलीप गंभिरे
बुधवार, 13 मे 2020

वधुपित्याने लग्नाच्या खर्चातून बचत झालेल्या रकमेतून ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. नवदांपत्याच्या हस्ते धनादेश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कळंब (जि. उस्मानाबाद) : उच्चशिक्षित वधू-वराचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने निसर्गरम्य आमराईत उत्साहात पार पडला. वधुपित्याने लग्नाच्या खर्चातून बचत झालेल्या रकमेतून ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. नवदांपत्याच्या हस्ते धनादेश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

कोरोनामुळे संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. शासन कोरोना विषाणूच्या संक्रमणाला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. संचारबंदीमुळे सार्वजनिक उत्सव, तसेच अन्य समारंभांवर बंदी आहे. त्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. तर काही जण प्रशासनाकडून परवानगी घेत अगदी मोजक्याच नातेवाइकांच्या साक्षीने उरकून घेत आहेत.

हेही वाचा - गावी परतल्याच्या आनंदाने मजूर गहिवरले... 

कळंब तालुक्यातील शेलगाव (दिवाणे) येथे अतिशय साध्या पद्धतीने उच्चशिक्षित वधू-वर रेशीमबंधनात अडकले. निसर्गरम्य आमराईत हा विवाह सोहळा आनंदात पार पडला. दरम्यान, कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यासाठी वधुपित्याने मदत केली. नवदांपत्याच्या हस्ते लग्नाच्या खर्चातून बचत झालेल्या रकमेमधून ५१ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली.

शेलगाव (दिवाणे) येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले भक्तराज दिवाणे यांची मुलगी प्रियांका हिचा विवाह ढाकणी (ता. लातूर) येथील गोविंद शिवाजीराव जाधव या युवकाशी ठरला होता. दोघेही अभियंता असून, लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ठरलेल्या मुहूर्तावरच १२ मे रोजी हा विवाह सोहळा आनंदात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

बँडबाजा ते मंगल कार्यालय असे सारे नियोजन झालेले असताना कोरोना संकटामुळे अडचणी निर्माण झाल्या; मात्र कोरोनामुळे दिवाणे व जाधव परिवाराने साधेपणाने अन् मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठरलेल्या मुहूर्तावरच मंगळवारी (ता. १२) शेलगाव (दिवाणे) येथील दिवाणे यांच्या शेतामधील आमराईत चारचौघांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हा विवाह सोहळा पार पडला. जे काही मोजके आप्तस्वकीय उपस्थित होते, त्यांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर केला. सर्वांना एका आम्रवृक्षाच्या सावलीत सुरक्षित अंतर राखून बसविण्यात आले होते.

ना बँड-ना वरात, ना कोणताही थाटमाट करता निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेला हा विवाह सोहळा आगळावेगळा ठरला. सामाजिक बांधिलकीतून शिक्षक संघाचे प्रदेश चिटणीस व वधुपिता भक्तराज दिवाणे यांनी ५१ हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा संकल्प केला होता.

हेही वाचा - मोंढा गजबजला हळद, हरभऱ्याची आवक वाढल्याने...  

सोहळ्यास उपस्थित असलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडे नवदांपत्याने निधीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, तालुकाध्यक्ष दत्ता पवार, मुख्याध्यापक रवींद्र शिनगारे, बालाजी आडसूळ उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad 51 thousand rupees help for CM Assistance Fund