उमरग्यात कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण, आता मास्कचा वापर अनिवार्य

अविनाश काळे
Thursday, 18 February 2021

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रत्येकांनी स्वतःची काळजी घेण्याची जबाबदारी वाढली आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याने आता सावधगिरी बाळगण्याची जबाबदारी वाढली आहे. दरम्यान दोन दिवसांत कोरोनाचे पाच रूग्ण आढळून आले आहेत. चार दिवसांपूर्वी माडज येथील एका पॉझिटिव्ह व्यक्तीचा मुत्यू झालेला आहे. उमरगा तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत दोन हजार तीनशेपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे.

त्यातील दोन हजार दोनशे जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासुन कोरोनाचा संसर्ग अधून-मधून वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठ दिवसांत तर रुग्ण संख्या वाढत आहे. शासनाने बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमाला मर्यादित स्वरुपात सवलत दिलेली आहे. मात्र नियमावलीचे पायमल्ली होतानाचे चित्र दिसत आहे. दरम्यान १६ फेब्रूवारी रोजी घेतलेल्या स्वॅबच्या अहवालात वडगाववाडी व सास्तूर येथील प्रत्येकी एक तर उमरगा शहरातील महादेव गल्लीतील एक जण पॉझिटिव्ह आला आहे.

वाचा - कोरोना लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह, पहिल्या डोसनंतरही धोका कायम

१७ फेब्रूवारी रोजी घेतलेल्या अन्टीजेन चाचणीत उमरगा शहरातील बसस्थानक परिसरातील दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. पंधरा स्वॅबचा अहवाल व गुरूवारी (ता.१८) घेतलेल्या २६ स्वॅबचा अहवाल आणखी प्राप्त व्हायचा आहे. माडज येथील एक पॉझिटिव्ह व्यक्तीवर सोलापूर येथे उपचार सुरू असताना १३ फेब्रूवारीला मृत्यू झाला. मात्र त्याचा अहवाल उपजिल्हा रुग्णालयाला उशीरा प्राप्त झाला आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता मॉस्कचा वापर अनिवार्य : उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रत्येकांनी स्वतःची काळजी घेण्याची जबाबदारी वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीत मास्कचा वापर अनिवार्य असला पाहिजे. स्वच्छतेची सवय कायम ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांची प्रतिक्षा करण्यापेक्षा सुरक्षितता व नियमांचे पालन करण्याचे कर्तव्य बजावले पाहिजे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Corona Updates Covid 5 Cases Reported In Umarga