उमरगा शहरात ४६ दिवसानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण

अविनाश काळे
गुरुवार, 21 मे 2020

मुंबई येथील कांदिवली परिसरात वास्तव्यास असलेली एक महिला दोन मुले व नातेवाईकासह रविवारी (ता. १७) पहाटे तीन वाजता मुंबईहून खासगी बसमधून आली होती. या बसमधून २९ जणांनी प्रवास केला होता.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरात ४६ दिवसानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. एका २७ वर्षीय महिलेचा अहवाल गुरूवारी (ता. २१) पॉझिटिव्ह आला असून, रुग्ण महिलेसह अन्य २८ जण मुंबई (कांदिवली) येथून आले होते. प्रशासनाने शहरातील तीन विभाग, तसेच हिप्परगाराव येथील काही भाग सील केला आहे.

कर्नाटकातील आळंद तालुक्यातील एक महिला दोन मुलांसह मुंबई येथील कांदिवली परिसरात वास्तव्यास होती. हे तिघे नातेवाईकासह रविवारी (ता. १७) पहाटे तीन वाजता मुंबईहून खासगी बसमधून २९ जणांसह आले होते. याच बसमधून तालुक्यातील हिप्परग्याचे दहा, शहरातील एकोंडीवाडी शिवारातील शेतात राहणाऱ्या महिलेसह सात, शहरातील जकापुर कॉलनीतील तीन तर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळील नऊ जण आले होते. आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

हेही वाचा पारंपरिक पदार्थांसह खवय्या मुलांची पोटपूजा जोरात

महिला, दोन मुले नातेवाईकांसह न्यू बालाजीनगर येथे नातेवाईकाच्या घरी गेली असता परिसरातील नागरिकांनी त्यांना राहण्यास विरोध केला. त्यामुळे ती महिला, दोन मुले व नातेवाईकासह एकोंडीवाडी शिवारात शेतात राहत होते. मंगळवारी (ता. १९) दुपारी महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर महिलेसह दोन्ही मुलांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी तिघांचेही अहवाल प्राप्त झाले असून, महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले. तब्बल ४६ दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती.

दरम्यान, तालुका व शहराच्या सीमा तातडीने बंद करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिल्या. शहरातील बालाजीनगर, चैतन्य कोचिंग क्लासेसचा परिसर, मूकबधिर शाळेच्या बाजूचा परिसर, मुगळे हॉस्पिटल रस्ता, पतंगे रोड आदी भागात कंटेनमेंट झोनचे आदेश देण्यात आले. बाधित परिसरास रेड झोन जाहीर करून बॅरेकेटिंग करण्यात आले आहे.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

२९ जणांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून रात्री उशीरापर्यंत सुरू होती. श्री. उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, धनराज गिरी यांनी न्यू बालाजीनगर येथे जाऊन पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Corona's new patient after 46 days in Omarga city