पारंपरिक पदार्थांसह खवय्या मुलांची पोटपूजा जोरात 

सुहास सदाव्रते 
सोमवार, 20 एप्रिल 2020

सध्या बाहेर जाऊन पाणीपुरी, भेळ, रगडा अन् समोसासह विविध चटपटीत पदार्थांवर ताव मारण्याची संधीच मुलांना नाही. त्यामुळे घरात वेगळे पदार्थ करण्यासाठी मुलांचा हट्ट आहे. अर्थात, चटपटीत पदार्थांऐवजी पारंपरिक पदार्थांसह हेल्दी फूड बनविण्यास पालकांकडून प्राधान्य दिले जात आहे. 

जालना - सक्तीची सुटी असल्याने बच्चेकंपनी घर डोक्यावर घेत आहे. बाहेर जाऊन पाणीपुरी, भेळ, रगडा अन् समोसासह विविध चटपटीत पदार्थांवर ताव मारण्याची संधीच मुलांना नाही. त्यामुळे घरात वेगळे पदार्थ करण्यासाठी मुलांचा हट्ट आहे. अर्थात, चटपटीत पदार्थांऐवजी पारंपरिक पदार्थांसह हेल्दी फूड बनविण्यास पालकांकडून प्राधान्य दिले जात आहे. 

सध्या संचारबंदी लागू होऊन एक महिना होत आहे. मुले घरातच असल्याने त्यांच्या करामती आणि कारनाम्यांना पालकांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

त्यातच पाणीपुरी, कचोरी, भेळ, समोसा, रगडा, आईस्क्रीम अशा चटपटीत व खमंग पदार्थांची आठवणही येणारच. दररोज तीच ती पोळी-भाजी नको, वेगळे काहीतरी हवे असा मुलांचा आग्रह असतो.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

त्यामुळे पारंपरिक भारतीय पदार्थ बनविण्याचा सिलसिलाही सुरू आहे. वटाणे, मूग, मटकीची सातळ, उपमा, इडली, धिरडे, धपाटे, थालीपीठ, खमंग ढोकळा, शेंगूळ, मसाला खिचडी, पुलाव, गडगीळ, कानवले, शिरा, शेवयांची खीर शिवाय सध्या विविध फळेही उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांचे ज्यूस, सलाडही तयार केले जात आहेत. रोज नवा खाद्यपदार्थ मिळत असल्याने खवय्या मुलांची पोटपूजा जोरात सुरू आहे. 

सध्या सुट्या असल्याने मुले सारखा हट्ट करतात. रोज काय करावे, असा प्रश्न पडतो; पण मुलांसाठी काहीतरी नवीन करावेच लागते. थालीपीठ, सुशीला, दही व इतर पालेभाज्यांचे धपाटे असे काही पदार्थ बनवून देत आहे. 
- स्वाती लोमटे , गृहिणी

आज पोळी-भाजी नको, दुसरे काही दे, असा मुलांचा आग्रह असतो. मुलांसाठी रोजच नवीन काय करावे, असा प्रश्न पडतो. ढोकळा, इडली-दोसा, उतप्पा, मसालेदार शेवया असे पदार्थ मुले आवडीने खातात. 
- वर्षा राऊतवाड , गृहिणी

घरात मुलांची नेहमीच फर्माईश असते. दररोज काहीतरी चांगले पाहिजे, असा मुलांचा हट्ट असतोच. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण करताना वेळ जातोच. मुलांना उपमा, मेदूवडा, मोड आलेल्या धान्यांची सातळ, मसाले खिचडी, पुलाव असे खमंग पदार्थ करावे लागतात. 
- माधुरी खेडेकर,  गृहिणी

सध्या सुट्या असल्याने मुले घरातच आहेत. रोजच कोणते पदार्थ करावे असा पेच पडतो. पोळी-भाजी खायला राजी नसतात तेव्हा केकचे विविध प्रकार, बालुशाही, जिलेबी, समोसा आणि शेव असे पदार्थ करावेत, अशी मागणी असते. 
- शुभांगी लामधाडे , गृहिणी

लहान मुलांना पदार्थ देताना गरम, तेलकट आणि आंबट देऊ नये. ज्या पदार्थांमधून प्रथिने व जीवनसत्त्व मिळतात असेच पदार्थ द्यावेत. दुधाचे पदार्थ, ताक, रवा-बेसन लाडू, आईस्क्रीमसह विविध कडधान्ये दिली पाहिजेत. 
- डॉ. संध्या रोटकर, 
आहारतज्ज्ञ, जालना 

पौष्टिक पदार्थ ः

 • बीट, पालक व मेथी पराठे 
 • गाजराचा हलवा 
 • मोड आलेली मटकी, मूग, चवळी. 
 • गूळ-शेंगदाणा लाडू 
 • खजूर-खोबरे लाडू 
 • लाल भोपळा पुरी 
 • मिश्र भाजी 
 • काकडी कोशिंबीर 
 • कोहळा वडी 
 • दुधी भोपळा रायता 
 • गूळ-शेंगदाणा चिक्की 
 • नाचणीचे लाडू 
 • गूळ-पोळीचा चुरमा 

मुलांसाठी पेय ः

 • कैरीचे पन्हे 
 • कोकम, लिंबू सरबत 
 • आवळा सरबत 
 • मसाला दूध 
 • लस्सी, ताक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents preference towards making healthy food