कोरोनाचा कहर : अखेरचे दर्शनही घेता आले नाही...

अविनाश काळे
रविवार, 31 मे 2020

मुंबईवरुन परतल्यानंतर एका कुटुंबातील ज्येष्ठासह तिघांना कोरोनाची बाधा झाली. तर मुलगा संशयिताच्या कक्षात आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ज्येष्ठाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. शनिवारी (ता. ३०) दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांच्यावर दफनविधी झाला; मात्र पत्नी, मुलासह छोट्या चिमुकलीलाही आपल्या आजोबाचे अखेरचे दर्शन घेता आले नाही.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तालुक्यातील बेडगा येथील ज्येष्ठ नागरिकाचा शुक्रवारी (ता. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. शनिवारी (ता. ३०) दुपारी सव्वाचारच्या सुमारास बेडगा शिवारातील त्यांच्या शेतात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.

बेडगा येथील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे गेली होती. लॉकडाऊनमुळे १६ मे रोजी मुंबईहून दोन खासगी बसमधून बेडगा येथील ३० जण गावाकडे परतले होते. एक ६० वर्षीय व्यक्ती आपल्या नातेवाईकासह आली होती. उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून गावातील शाळेत विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा..

कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ मे रोजी त्यांचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता. मात्र २६ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. मधुमेह, रक्तदाब या आजाराने त्रस्त असताना त्यात किडनीचे कार्य मंदावले होते. डॉक्टर्सच्या टिमने अत्याधुनिक उपकरणाचा आधार देत प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही. अखेर शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

सुरक्षितरित्या झाला दफनविधी 
कोरोना आजाराने मृत्यू झाल्याने अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकासह समाजमनावर भितीची गडद छाया याचा प्रत्यय आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत पुरी यांनी रुग्णालयातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन त्या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह शीतगृहात ठेवला होता. कोरोनाग्रस्त असल्याने मृतदेह विशेष किटमध्ये ठेवण्यात आला.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

बेडगा गावात दफनविधीस मुबलक जागा नाही. शिवाय गावालगतच एका बंधाऱ्यावर दफनभूमी असल्याने प्रारंभी काही जणांचा विरोध होता. तर मृताचे जवळचे नातेवाईक उमरग्यात असल्याने येथे दफनविधी करण्याचा नातेवाईकांचा आग्रह होता. मात्र शहरातील बांधवांनी त्याला विरोध केला. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांनी दुपारी एकपर्यंत दफनविधीचा तिढा सुटत नसल्याने बेडगा ग्रामपंचायत, नातेवाईकास माहिती दिली.

त्यानंतर त्यांच्या शेतात दफनविधी करण्याचा निर्णय झाला. उपजिल्हा रुग्णालयाने दुपारी साडेतीन वाजता रुग्णवाहिका चालकाने दोन शिपाईसह मृतदेह बेडगा येथे नेला. मृतावर दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांच्या शेतात दफनविधी करण्यात आला. या वेळी मोजके नातेवाईक उपस्थित होते. 

पत्नी, मुलालाही भेटता आले नाही 
वडिलाचा मृत्यू झाल्याची माहिती संशयिताच्या कक्षात असलेल्या मुलाला देण्यात आली. वडिलाच्या मृत्यूचे दुःख पचवत पॉझिटिव्ह आलेल्या आईला हे सांगण्याचे धाडस मुलाला होत नव्हते. तर सात वर्षांच्या चिमुकलीला बाधा झाल्याने तिलाही आजोबाच्या मृत्यूची घटना सांगणे कठीण होते. काही वेळाने पतीचा मृत्यू झाल्याची माहिती पत्नीला कळाली. जीवनाचा साथीदार गेल्याचे दु:ख डोळ्यांतील अश्रू सांगत होते. मात्र पत्नी, मुलासह छोट्या चिमुकलीलाही आपल्या आजोबाचे अखेरचे दर्शन घेता आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Death of a senior citizen