समाजसेवकांकडून गरजूंना घरपोच धान्यवाटप

राजेंद्रकुमार जाधव
गुरुवार, 26 मार्च 2020

महिनाभर पुरेल एवढे धान्य वाटप केले जात आहे. या उपक्रमासाठी उस्मानाबाद शहरातील काही समाजसेवकांनी पुढाकार घेतला आहे.

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदी लक्षात घेता सर्वसामान्य गरीब कुटुंबांना व रोजगार करून पोट भरणाऱ्या मजुरांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून शहरातील काही समाजसेवकांनी पुढाकार घेऊन धान्य पोच करण्याचे काम सुरू केले आहे. गरजू कुटुंबीयांना एक महिनाभर पुरेल इतके धान्य वाटप केले जात आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

गरीब कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप करण्याचे काम समाजसेवक गफ्फार शेख, जलील शेख, ॲड. इम्रान गवंडी, शाहनवाज सय्यद यांच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २६) ख्वाजानगर भागात पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दग्गुभाई शेख यांच्या हस्ते गरीब, गरजू कुटुंबीयांना धान्याचे वाटप करण्यात आले. शहरातील कुष्ठधाम, तांडा भाग, जुना बस डेपो परिसरातील गरजू कुटुंबीयांना धान्याचे वाटप करण्यात आले. आगामी एक महिनाभर पुरेसे ठरेल इतके धान्य अशा कुटुंबीयांना देण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे काम, उद्योगधंदे, रोजगार बंद असल्याने अनेक कुटुंबांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व समाजसेवकांनी पुढाकार घेतला आहे. यात उस्मानाबाद शहरातील उद्योजक गफ्फार शेख, जलील शेख, ॲड. इम्रान गवंडी, शाहनवाज सय्यद यांनी घरपोच धान्य पोचविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

प्रत्येक प्रभागातील गरजू कुटुंबांत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. तांडा, कुष्ठधाम, जुना बस डेपो, शहजाद चौक या भागांत गेल्या तीन दिवसांत धान्याचेच्या ७०० बॅग गरजू कुटुंबीयांना वाटप करण्यात आल्या. धान्याचे वाटप करतेवेळी नागरिकांना घरी राहूनच आरोग्याची काळजी घेण्याची विनंतीही या समाजसेवकांकडून करण्यात येत आहे. 
सध्या कठीण परिस्थितीत मानवाच्या हितासाठी दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. धान्य पुरवण्याचे कार्य हे अखंडितपणे चालणार असून, सर्व गरजूंपर्यंत धान्य पोच केले जाणार आहे, असे गफ्फार शेख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Distribution Of Food From Social Workers To The Needy