esakal | उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिवेगावकरांचा साधेपणा भावला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad District Collector Kaustubh Divegaonkar

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तालुक्यातील पिंप्री येथे शेतावर जाऊन शेतकऱ्यासोबत बसून चर्चा केल्याने त्यांचा साधेपणा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिवेगावकरांचा साधेपणा भावला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली चर्चा

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तालुक्यातील पिंप्री येथे शेतावर जाऊन शेतकऱ्यासोबत बसून चर्चा केल्याने त्यांचा साधेपणा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. `काय बाबा, शेतात सध्या काय सुरू आहे? काही अडचणी आहेत का? अशी विचारणा करीत त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होत आहे. पिंप्री येथील एका गोदामात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

त्याची तपासणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिवेगावकर तेथे गेले होते. यावेळी त्यांना थोडा फावला वेळ मिळाला. सर्वजण सावलीला बसले होते. गोडाऊनच्या बाजूला शेतकरी गायकवाड यांचे शेत आहे. त्यांचे शेतात काम सुरू होते. शेतात बांधलेल्या दोन-चार शेळ्या, चारही बाजूने उघडा परंतू छतपत्र्याने झाकलेले असा गोठा, पाहून जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य शेतकरी असल्याचे दिसले. जिल्हाधिकारी अगदी त्याच तत्परतेने त्या मोडक्या- तोडक्या पत्र्यात जाऊन बसले. तेव्हा शेतकरी गायकवाड यांनी त्यांना बसण्यासाठी चटई दिली. त्यांनी अगदी आस्थेने गायकवाड यांना विविध बाबी विचारल्या.

शेतात काय उत्पन्न घेतलत. शेळ्या किती आहेत? खरीपात किती उत्पन्न मिळते. सोयाबीन पिकातून काही फायदा झाला का? जिल्हाधिकाऱ्यांनी जिव्हाळ्याने असे प्रश्न विचारताच शेतकऱ्याचाही उर भरून आला. गायकवाड यांच्या घरातील मंडळीही जिल्हाधिकारी आल्याने भारावून गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नाची प्रामाणिकपणे गायकवाड यांनी उत्तरे दिली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या साधेपणाची चर्चा जिल्हाभर सुरू होती. प्रत्यक्ष फिरल्याशिवाय परिस्थितीचे आकलन होत नाही. त्यामुळे अनुभव घेतला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी यावेळी दिली.


प्रत्यक्ष भेटल्याशिवाय खरी माहिती समोर येत नाही. आपल्यालाही काही गोष्टींचा अंदाज येतो. शेतकऱ्यांपेक्षा आपण शहाणे नाहीत. थोडासा वेळ होता म्हणून काही माहिती जाणून घेण्यासाठी गायकवाड यांच्या शेतात जावून बसलो.
- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

 

संपादन - गणेश पिटेकर