esakal | राजस्थानातून परतलेले ८० भाविक होम क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

उस्मानाबाद जिल्ह्यातील हे ८० भाविक राज्य सरकारची परवानगी घेऊन शुक्रवारी (ता. एक) मध्यरात्री दोन खासगी वाहनांनी मूळ गावी परतले. या सर्वांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

राजस्थानातून परतलेले ८० भाविक होम क्वारंटाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वशांती विद्यालयाअंतर्गत धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानात गेलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील ८० भाविक राज्य सरकारची परवानगी घेऊन शुक्रवारी (ता. एक) मध्यरात्री दोन खासगी वाहनांनी मूळ गावी परतले. या सर्वांना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

राजस्थानमधील माउंट अबू येथे २० मार्च रोजी बाबा मिलन आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ८० भाविक रेल्वेने १३ मार्च रोजी राजस्थानला गेले होते. २३ मार्च रोजी परतीसाठी रेल्वेचे आरक्षणही त्यांनी केले होते. मात्र २२ मार्चपासून कोरोनामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर तीन मेपर्यंत लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आली.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

आता पुन्हा एकदा १७ मेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाविक गेल्या दीड महिन्यापासून राजस्थानातच अडकून पडले होते. परतीसाठी अनेकवेळा भाविकांनी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली. अखेर २७ एप्रिल रोजी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने नियम व अटी घालून भाविकांना स्वखर्चाने खासगी वाहनाने येण्याची परवानगी दिली.

त्यानुसार २८ एप्रिल रोजी सरकारने दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत दोन खासगी बसने ते परत निघाले. संपूर्ण बसचे निर्जंतुकीकरण करीत भाविकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला. तसेच निघण्यापूर्वी आरोग्य तपासणीही केली होती. लॉकडाउनमुळे एका दिवसाऐवजी तीन दिवस प्रवासात गेले. अखेर शुक्रवारी (ता. एक) मध्यरात्रीच्या सुमारास सर्व भाविक गावी पोचले.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

राज्यासह जिल्हा सीमा बंदीमुळे अनेक ठिकाणी पोलिसांना माहिती देण्यातच आमचा अधिक वेळ गेला, असे काहींनी सांगितले. शिवाय रस्त्यावरील सर्व हॉटेल बंद असल्याने मोठे हाल झाले. त्यामुळे आम्हाला फार त्रास सहन करीत गाव गाठावे लागले, असे परतलेल्या भाविकांनी सांगितले. 
उमरगा व लोहारा तालुक्यांतून सर्वाधिक ५१ भाविक या कार्यक्रमाला गेले होते. तर उस्मानाबादचे तीन, भूम चार, कळंब १४, परंडा सात असे एकूण जवळपास ८० भाविक राजस्थानात अडकले होते. शुक्रवारी मध्यरात्री परतल्यानंतर सर्व भाविकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी व स्क्रीनिंग करून घेतले.

डॉक्टरांनी या सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन केले असून, क्वारंटाइनचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अशा सूचना संबंधित भाविकांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील केवळ ग्रीन व ऑरेंज झोनमधीलच भाविकांना परत पाठविण्यात आले आहे. तर रेड झोन जिल्ह्यातील भाविक अद्यापही राजस्थानातच अडकले आहेत. तसेच तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यातील हजारो भाविक परवानगीअभावी राजस्थानातच अडकले असल्याची माहिती भाविक ब्रह्माकुमार राजेंद्र भालकटे यांनी दिली.