esakal | उस्मानाबाद,कळंब तालुक्यांना पावसाची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

उस्मानाबाद,कळंब तालुक्यांना पावसाची प्रतिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यातल्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १८ टक्के वाढ झाली असून उपयुक्त पाणीसाठा ४७ टक्क्यावर पोहचला आहे. तुळजापूर,(Tuljapur) भूम आणि परंडा (Paranda) येथील मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. कळंब (kalamb), उस्मानाबाद (Osmanabad) तालुक्यात मात्र अद्यापही अपेक्षित पाणीसाठा वाढलेला नाही.

मराठवाड्यात गेल्या तीन-चार दिवसांत मोठा पाऊस झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा वगळता इतरत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी इतर जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प या पावसाने पूर्णपणे भरले आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. भूम, परंडा तसेच तुळजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने तेथील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र उस्मानाबाद, कळंब तालुक्यातील प्रकल्पात मात्र पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांच्या चिंतेची भर पडली आहे.

हेही वाचा: पुणे : पाणी प्रश्‍नावरून मुख्यसभेत कावड आंदोलन

पाणीसाठा वाढला

जिल्ह्यात एकूण १७ मध्यम प्रकल्प आहेत. भूम तालुक्यात बाणगंगा, रामगंगा आणि संगमेश्वर असे तीन मध्यम प्रकल्प असून तिन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंडा तालुक्यात चार मध्यम प्रकल्प असून खासापुरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तर चांदणी प्रकल्पात ८२ टक्के पाणीसाठा आहे. खंडेश्वर आणि साकत प्रकल्पात मात्र अनुक्रमे २०, १२ टक्के पाणीसाठा असून तेथे पावसाची गरज आहे. तुळजापूर तालुक्यातील कुरनूर, हरळी आणि खंडाळा हे तिन्ही मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. भूम तालुक्यातल्या लघु प्रक्लपातलाही पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परंडा तालुक्यातही चांगला पाऊस झाल्याने काही लघु प्रकल्प भरले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने सिनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पात सध्या केवळ १२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद : शहरात १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेस मंजुरी

शुन्य टक्के पाणीसाठा

उस्मानाबाद तालुक्यातील तीन पैकी तेरणा मध्यम प्रकल्पात ६७ टक्केपाणीसाठा झाला आहे. पण, शहरालगत असलेल्या रुईभर मध्यम प्रकल्पात केवळ २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय ढोकी, कोलेगाव, घुगी, टाकळी, वरुडा, जागजी, आळणी, गोपाळवाडी, पाडोळी, राजेबोरगाव, खेड, उपळा, कोंड या लघु प्रकल्पात अद्यापही शुन्य टक्के पाणीसाठा आहे.

कळंब तालुक्यातील एकमेव रायगव्हाण मध्यम प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा असून शिराढोण, कोठवाळवाडी, भाटसांगवी, बारातेवाडी, आडसूळवाडी, पाडोळी, नागुलगाव, गोविंदपूर हे सर्वच लघु प्रकल्प आणि साठवण तलावातील पाणीसाठा शुन्य टक्क्याच्या खालीच आहे. वाशी तालुक्यातही अशीच स्थिती असून सेलू, मांडवा, दहिफळ, हातोला लघु प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान लोहारा तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील बहुतांश प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे.

loading image
go to top