परंडा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

नालगाव येथील बाधित रुग्णाच्या संपर्कातील नऊ, तर आसू येथील आठ अशा एकूण १७ जणांना क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे.

परंडा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून, रविवारी (ता. २८) रात्री उशिरा नालगाव व आसू येथे प्रत्येकी एक असे दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. नालगाव येथील बाधित रुग्ण बार्शी येथून खासगी रुग्णालयातून, तर आसू येथील रुग्ण तुळजापूर येथून बाधित झाला आहे. या रुग्णांच्या संपर्कातील एकूण १७ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाने नालगाव सील केले असून, आसू येथील बाधित रुग्णाच्या घराचा परिसर सील केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जावेद सय्यद यांनी दिली. या दोन रुग्णांमुळे तालुक्यातील बाधित रुग्णसंख्या तीन झाली आहे. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

नालगाव येथील ३० वर्षीय कोरोनाबाधित युवक तुळजापूर येथे गेला होता. तर आसू येथील ३८ वर्षीय रुग्णाने परंडा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बार्शी येथे खासगी रुग्णालयात गेला होता. दोघांचे स्वॅब अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. ही माहिती रात्री उशिरा परंडा येथील स्थानिक प्रशासनाला मिळताच आरोग्य विभाग व पोलिस कर्मचाऱ्यांनी नालगाव गाठून परिसर सील केले. नालगाव येथील बाधित रुग्णाच्या संपर्कातील नऊ, तर आसू येथील आठ अशा एकूण १७ जणांना क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान 

नालगाव येथील बाधित रुग्ण तुळजापूर येथे उपचार घेत आहेत. तर आसू येथील रुग्णावर उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात दोन बाधितांची संख्या वाढल्याने अनेकांची झोप उडाली आहे. दरम्यान, आसू येथील बाधित रुग्णाने परंडा शहरात उपचार घेतलेला खासगी दवाखाना सील करण्यात आला आहे. 

बार्शी व तुळजापूर येथे गेलेल्या दोघांचा कोरोनाबाधित अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त होताच प्रशासनाने रात्रीच नालगाव सील केले. आरोग्य विभागाची पथके गावात सर्व्हे करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू आहे. या दोन गावांतील १७ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
- डॉ. जावेद सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी, परंडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about corona