दरवर्षी लाखोंची मांदियाळी, मात्र यंदा शुकशुकाट

प्रकाश काशीद
Monday, 20 April 2020

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री काळभैरवनाथांच्या यात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची यात्रा रद्द झाली आहे.

परंडा (जि. उस्मानाबाद) : श्रीक्षेत्र सोनारी येथील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवांच्या चैत्र यात्रेतील रथोत्सवाचा मुख्य दिवस सोमवारी (ता. २०) होता. दरवर्षी रथोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आल्याने सोनारी परिसरात शुकशुकाट होता.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, कुलदैवत श्री काळभैरवनाथांच्या यात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात. यंदाच्या यात्रोत्सवास १८ एप्रिलपासून सुरवात झाली असून, सोमवारी रथोत्सवाचा मुख्य दिवस होता. काळभैरवनाथांची पहाटे मंदिराचे मुख्य संजय महाराज, समीर पुजारी यांनी विधिवत पूजाअर्चा केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

दरवर्षी दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाला सुरवात होते. यंदा मात्र मंदिर परिसर भाविकांअभावी सुनासुनाच राहिला. भाविकांचे दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ यात्रोत्सवाची सुरवात चैत्र शुद्ध अष्टमीस देवाला हळद लागताच होते. रथोत्सव, यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे सारेच चित्र बदलले.

नवसपूर्ती, यात्रेतील रथ ओढण्यासाठी दूरगावाहून भाविक मोठी गर्दी करतात. रथाला काठी टेकवल्यानंतरच यात्रा सफल झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यात्राकाळात सोनारीतील सर्वच रस्ते गुलालाने माखलेले असतात. यंदा कोरोना संसर्गाचा खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी सोनारीत मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, यासाठी सर्वच मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटातून लवकरच सर्वांची सुटका होऊ दे, सर्वांच्या सुख-समाधानासाठी काळभैरवनाथ देवाकडे साकडे घातले असल्याचे मंदिराचे मुख्य संजय पुजारी, समीर पुजारी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about Shri Kalabhairavanath Temple Sonari