दरवर्षी धामधूम; यंदा मात्र सामसूम!

जगदीश कुलकर्णी
बुधवार, 8 एप्रिल 2020

श्री तुळजाभवानी माता, येडेश्वरी देवीची चैत्री यात्रा भाविकांविना पार पडली. परंपरेनुसार मंगळवारी (ता. सात) रात्री छबिना झाला. मंदिरातील मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आज पहाटे चरणतीर्थ, नित्योपचार अभिषेक पूजा, अंगारा मिरवणूक झाली.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या सावटामुळे यंदा प्रथमच तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा बुधवारी (ता. आठ) झाली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात गेल्या वीस दिवसांपासून असलेला शुकशुकाट आजही कायम होता. मंदिरात केवळ काही धार्मिक कार्यक्रम झाले. 

तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा मोठी असते. लाखो भाविक दाखल होतात. अनेक पालख्या येतात. भाविकांसह व्यापाऱ्यांसाठी यात्रा ही पर्वणी असते. कोरोनामुळे तुळजाभवानी मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे यात्राही रद्दचा निर्णय यापूर्वीच झाला होता. त्यानुसार आज मंदिर परिसरात शुकशुकाट होता. यात्रेपूर्वी परंपरेनुसार मंगळवारी (ता. सात) रात्री छबिना झाला. मंदिरातील मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आज पहाटे चरणतीर्थ, नित्योपचार अभिषेक पूजा, अंगारा मिरवणूक झाली. 

हेही वाचा :  बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

सारे शहर सुनेसुने 
चैत्री पौर्णिमेनिमित्त जोगवा, जागरण-गोंधळ, माळ परडी उजळणे, देवभेट, पोत ओवाळणे आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. झांज, ढोलकी, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकाही दाखल होतात. सारे शहर भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. यंदा प्रथमच असे काही दिसले नाही. यात्रेनिमित्त अनेकांचे होणारे खेटे झाले नाहीत. यात्रेनिमित्त नायगाव शिरवळ (जि. सातारा) येथील काठ्या शहरातील कमानवेस भागात येतात. जिल्हाबंदी असल्याने त्याही येऊ शकल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about Tuljavani Mata Temple