मित्राच्या निधनानंतर संवगड्यांनी केली मदत

अविनाश काळे
Wednesday, 23 December 2020

प्रदिप काळे यांचे दीड महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने  निधन झाल्याने त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुलीवर दुखाचा डोंगर कोसळला

उमरगा (जि. उस्मानाबाद) : महाविद्यालयीन जीवनातील सवंगड्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने त्याच्या दोन मुलीच्या नावे नव्वद हजाराची मुदत ठेव जमा करून महाविद्यालयीन जीवनातील वर्गमित्रानी मोलाची मदत केली आहे.

तोरंबा (ता. लोहारा) येथील वर्गमित्र प्रदिप काळे यांचे दीड महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने  निधन झाल्याने त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुलीवर दुखाचा डोंगर कोसळला. कै. काळे हे मातोश्री काशीबाई बिराजदार विद्यालय कोराळ येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते परंतू ही शाळा कायम विनाअनुदानित असल्याने गेली पंधरा वर्षे ते विनावेतन काम करत होते.

औरंगाबादच्या सिडको चौकात भीषण अपघात; एक तरुण ठार, बसमधील दहा प्रवासी जखमी

त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले होते. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कै. काळे यांचे नऊ नोव्हेंबरला निधन झाले. घरातील परिस्थिती बेताचीच असल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्याच्या कुटूंबाला आधार देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बी.एससी या वॉट्सअप ग्रूपवर मदत करण्याचे आवाहन केले होते.

सदर आवाहनाला प्रतिसाद देत बी.एससी ( १९९७-२०००), उमरगा गणित मंडळ व दाळींब केंद्र या वॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांनी जवळपास नव्वद हजार रुपये वर्गणी गोळा करुन कै. काळे यांच्या दोन्ही मुलींच्या अनुक्रमे पन्नास व चाळीस हजार रुपये पुढील शिक्षणासाठी  उमरगा शहरातील सोलापूर जनता बँकेत मुदत ठेव  ठेवली.

वाहन दरीत कोसळून लातूर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण, सियाचीन सीमेवरील घटना

पतीच्या निधनाच्या नंतर पतीच्या महाविद्यालयीन  मित्राकडून झालेली मदत पाहुण श्रीमती मीरा काळे  भारावून गेल्या. मंगळवारी (ता. २२) बँकेचे शाखाधिकारी जयवंत कोकाटे, वर्गमित्र जाफर मुल्ला, प्रदिप भोसले, खाजा मुजावर,  पत्रकार शंकर बिराजदार, कनिष्ठ अधिकारी विजय कुलकर्णी, कनिष्ठ लिपिक धिरज मुगळीकर, सुरज देशपांडे, रोखपाल उदय जोशी, सेवक लिंबाजी अंबुलगे यांची या वेळी उपस्थिती होती.

"पती गेली पंधरा वर्षे विनावेतनावर शाळेत काम करत होते, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती खालवली होती, त्यातच पतीचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कुटूंबावर मोठे संकट आले. पतीच्या महाविद्यालयीन व सहकारी मित्रांनी केलेली मदत अनमोल असून यामुळे भविष्यात जगण्यासाठी आधार मिळणार आहे." श्रीमती मीरा काळे 

 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad news of helping friends to family after death