माजी आमदार मोटे, खासदार राजेनिंबाळकर एकाच व्यासपीठावर! नव्या राजकीय समीकरणाची नांदी?  

तानाजी जाधवर
Thursday, 28 January 2021

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडी वेळी प्रा.सावंत यांनी थेट राजेनिंबाळकर यांचे शत्रू राणाजगजितसिंह पाटील यांना साथ देत सत्ता हस्तगत केली.

उस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रा.तानाजी सावंत हे पुन्हा चर्चेत आले आहेत. स्वपक्षातील खासदार व आमदार यांना बेदखल करण्याचा प्रयत्न प्रा.सावंत यांनी केला होता. दुसऱ्याच दिवशी माजी आमदार राहुल मोटे व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. मोटे व राजेनिंबाळकर यानी टायमिंग साधत उचित संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

खासदार राजेनिंबाळकर व प्रा.सावंत यांच्यामध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडी वेळी प्रा.सावंत यांनी थेट राजेनिंबाळकर यांचे शत्रू राणाजगजितसिंह पाटील यांना साथ देत सत्ता हस्तगत केली. यावेळी माजी आमदार मोटे यांच्याशी जुळवून घेणार नाही असाच काहीसा संदेश प्रा.सावंत यांनी दिल्याचे दिसून आले. त्याचवेळी खासदार राजेनिंबाळकर यांच्या हातात येणारी जिल्हा परिषद फक्त प्रा.सावंत यांच्यामुळे पुन्हा आमदार राणा पाटील यांच्याकडे गेली. या गोष्टीमुळे या दोघांमध्ये काही प्रमाणात अंतर पडल्याचेही दिसून येत होते.

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

पण जाहीरपणे ते दिसलेले नव्हते. मात्र २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रा.सावंत यांनी खासदार राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. यामुळे खासदार राजेनिंबाळकर व्यथित झाल्याचे दिसत होते. पण दुसऱ्याच दिवशी प्रा. सावंत यांचे राजकीय विरोधक राहुल मोटे व ओमराजे एकाच व्यासपीठावर दिसले. एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी हजेरी लावणे हा निव्वळ योगायोगच मानला पाहिजे की, राजकीय राजनय हे आताच सांगणे कठीण आहे. आजवर राहुल मोटे व खासदार राजेनिंबाळकर यांच्यामध्ये संवाद होता, पण त्याला एक प्रकारची मर्यादा होती. या दोघांत नातेसंबंध असतानाही राजकीय संबंधात मात्र गोडवा दिसून आलेला नव्हता. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

दोघांची परिस्थिती सारखीच 
प्रा.सावंत व राहुल मोटे हे राजकीय विरोधक तसेच आमदार राणा पाटील व खासदार ओमराजे यांच्यातील संघर्ष तर सर्वश्रुत आहे. श्री.मोटे व आमदार पाटील यांच्यामध्ये अत्यंत घरोब्याचे सबंध मात्र आता सावंत यांच्याशी केलेली जवळीक श्री.मोटे यांना आवडणे कठीण आहे. त्यामुळे सद्यःस्थितीला खासदार ओमराजे व राहुल मोटे यांची परिस्थिती सारखीच झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात नव्या राजकीय समीकरणाची नांदी बघायला मिळणार का याविषयी आतापासूनचं चर्चा सुरू झाली आहे. 

 

संपादन - गणेश पिेटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News MP Rejenimbalkar Former MLA Mote On Same Dias Marathi News